दिल्लीत गुटखा खाऊन थुंकल्याने गोळीबार

दिल्लीतील खजुरी खास भागात गुटखा खाऊन थुंकण्यावरून झालेल्या वादात एकाला गोळी मारण्यात आली. 35 वर्षीय आमीर असे गोळी लागलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पाठीला गोळी लागली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ही घटना घडली. गुटखा खाऊन थुंकण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद वाढला आणि एकाने पिस्तूलने गोळीबार केला. यामध्ये आमीर जखमी झाला. अमन (20), त्याचे वडील इरफान (40) आणि रेहान (18) अशी तिघा आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अमनला अटक झाली आहे. उर्वरित दोघा आरोपींना अटक करण्यासाठी आणि गुह्यात वापरलेली बंदूक जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.