तुर्कीवरील बहिष्काराने कश्मिरी सफरचंदाची लाली वाढणार; विक्री वाढण्याची शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आशा

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कीविरोधात हिंदुस्थानात तीव्र नाराजी आहे. तुर्कीवर बहिष्काराचा ट्रेंड कायम आहे. तुर्कीचा माल विशेष करून सफरचंदांवर बहिष्कार घालण्यात आलाय. याचे कश्मिरच्या फळोत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे कश्मिरी सफरचंदाला 10 ते 15 टक्के नफा मिळेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे.

कश्मिरी फळ संघाचे अध्यक्ष बशीर अहमद म्हणाले, तुर्कीच्या सफरचंदांचा भाव अमेरिकेच्या सफरचंदांपेक्षा कमी होता. त्यामुळे आमचे खूप नुकसान व्हायचे. अशातच हिंदुस्थानच्या व्यापारी वर्गाने तुर्कीच्या फळावर बहिष्कार घालायचे ठरवले असेल तर काश्मिरी शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. त्यांच्या फळाला चांगला भाव मिळेल. तुर्की आणि कश्मीरचे सफरचंदाचे फळ सारखेच आहे. त्यामुळे लोकांना आमचे फळ आवडेल.

शेती तज्ञ राशिद राहिल यांच्या मते, तुर्कस्थानच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यानंतर केवळ मेक इन इंडियाला चालना मिळणार नाही तर कमीत कमी 7 ते 8 लाख सफरचंद उत्पादन शेतकऱ्यांचा फायदा होईल. कश्मिरी अर्थव्यवस्थेचा विचार केला की आमच्याकडे फक्त पर्यटन आणि बागा या दोनच गोष्टी आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आमच्या पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. मात्र फळबागांमुळे आमची अर्थव्यवस्था सुधारू शकते.

  • या वर्षी हिंदुस्थानात 23 टक्के सफरचंद तुर्कीमधून आयात करण्यात आली. त्यामुळे कश्मिरच्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणे कठीण झाले.
  • परदेशी सफरचंदाची क्रेझ आणि तुलनेने कमी दर यामुळे तुर्कीच्या सफरचंदांना मागणी असते.
  • कश्मीरमध्ये 22 लाख मेट्रीक टन सफरचंदाचे उत्पादन होते. जम्मू कश्मीरच्या जीडीपीमध्ये याचे 15 टक्के योगदान आहे.
  • कश्मिरमधील सुमारे 7 लाख आणि हिमाचल प्रदेशातील दोन लाखापेक्षा जास्त कुटुंब उदरनिर्वाहासाठी सफरचंदाच्या शेतीवर अवलंबून आहेत.