
राजस्थानच्या करौली जिह्यातील महिलांनी आपल्या पुढाकाराने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्षानुवर्षे दुष्काळ असलेल्या या भागात नारी शक्तीच्या ध्यासामुळे कायापालट झाला. सुमारे 15 वर्षांपूर्वीपर्यंत येथील महिला घाबरत होत्या. सततच्या दुष्काळामुळे त्यांचे पती उदरनिर्वाहासाठी हिंसेच्या मार्गाला गेले. पर्जन्यमान कमी झाले आणि वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे जमीन नापीक झाली होती. पाण्याचा साठा आटला होता. त्यामुळे शेती आणि पशुपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला. पाण्याच्या समस्येमुळे उद्भवत असलेल्या संकटावर मात करण्यासाठी संपत्ती देवी आणि त्यांच्यासारख्या अनेक महिला सरसावल्या. या संकटाला तोंड देण्याचे ठरविले व तिथूनच बदलाला सुरुवात झाली. दुष्काळामुळे अनेक पुरुष पैशांसाठी लुटमार, धमकावणे अशी कृत्ये करू लागले. ते पोलिसांच्या भीतीने जवळच्या जंगलात लपून बसत असत. महिलांनी आपल्या पतींना जंगलातून बाहेर येण्यास आणि शस्त्र खाली टाकण्यास प्रवृत्त केले.
उन्हाळ्यातही मुबलक पाणी
जंगल परिसरात आणखी 16 तलाव बांधल्याने उतारावरून वाहून जाणारे पाणी साठून राहते. पावसाळ्यात साठलेले पाणी दीर्घकाळ टिकते. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. जलसंधारणामुळे नवीन शेतीच्या संधी निर्माण झाल्या. पाण्यामुळे या भागात स्थिरता आली असून पूर्वी पाण्याच्या अभावामुळे गुन्हेगारी वाढली होती. एकेकाळी करौलीचा भाग दरोडेखोरांसाठी ओळखला जायचा, पण आता उन्हाळ्यातही येथे मुबलक पाणी असते, असे करौलीचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश ज्योती उपाध्याय सांगतात.
शस्त्रे टाकली आणि शेतकरी बनला
महिलांनी काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कोरड्या पडलेल्या तलावांचा विकास केला. नवीन जलसाठे बांधणे सुरू केले. दूध विकून कमावलेला पैसा एकत्र करून 2015-16 मध्ये एका गावाजवळ टेकडीच्या पायथ्याशी लहान डोह बांधण्यात आले. पाऊस आल्यानंतर हे डोह पाण्याने भरले आणि पहिल्यांदाच जास्त काळ पाणी टिकून राहिले. संपत्ती देवी यांचे पती जगदीश सांगतात की, मी आतापर्यंत मरण पावलो असतो, पण पत्नीने जंगलातून परत आणले. शस्त्रे टाकली आणि पुन्हा शेती करण्यास सुरुवात केली. आता आम्ही मोहरी, गहू, मोती बाजरी आणि भाज्या पिकवतो.