
राक्षसी कोरोनाने पुन्हा हातपाय पसरले असून आज ठाण्यात 11 नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ठाण्यात 30 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. यातील सात जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने योग्य ती काळजी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाण्यातदेखील कोरोनाने हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच शनिवारी मुंब्रातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागदेखील सतर्क झाला आहे. ठाणे शहरात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या 30 रुग्णांपैकी 22 जणांवर घरीच उपचार सुरू आहेत. तर सात रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील सहा जणांवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात तर एका रुग्णावर महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरणाच्या यंत्रणा सज्ज
ठाण्यात 21 मे रोजी तीन, 22 मे चार आणि 23 मे तीन, 24 मे 9 तर 25 मे रोजी तब्बल 11 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे तर कळवा रुग्णालयात 19 खाटांचा विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे. डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा पुरवण्यात येणार आहे.
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या नागरिकांनी अधिक | काळजी घ्यावी. तसेच ज्यांना मधुमेह, उच्च उच्च रक्तदाब, इतर व्याधी आहेत त्यांना लागण होण्याची शक्यता जास्त असून त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. – डॉ. अनिरुद्ध माळगावकर (अधीक्षक, कळवा रुग्णालय)