खारघर, तळोजात मोकाट कुत्र्यांची दहशत; 94 जणांचा चावा घेतला

खारघर आणि तळोजा नोडमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या व्यक्तींवर मोकाट कुत्र्यांचा कळप हल्ला करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्षभरात मोकाट कुत्र्यांनी खारघरमध्ये 54 तर तळोजामध्ये 40 जणांचा चावा घेतला आहे. पालिकेकडून सुरू असलेल्या निर्बिजीकरणाचा बोजवारा उडाल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोहीम राबवली जात असताना, खारघर तळोजा वसाहतीत मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर आणि तळोजा वसाहतीत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर, गल्लीत टोळक्याने फिरणाऱ्या या कुत्र्यांमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिका प्रशासनाकडून मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे. निर्बिजीकरणामुळे कुत्र्यांची संख्या कमी होणे आवश्यक होते; मात्र त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. तळोजा वसाहतीत आजही कुत्र्यांची लहान लहान पिल्ले जागोजागी दिसून येतात. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांची टोळी खुले आम फिरत असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध, व्यापारी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

दुचाकीस्वारांचा पाठलाग
वर्षभरात खारघर परिसरात 54 जणांना; तर तळोजा वसाहतीत 40 जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. शहरात वर्दळीच्या भागात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. दिवस-रात्र मोकाट कुत्री रस्त्यावर टोळीने फिरतात. अनेकदा ही कुत्री पादचारी, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे जोरजोरात भुंकत पळतात. कधी कधी कुत्रे अचानक दुचाकीच्या आडवे आल्याने अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत.

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकलीचा मृत्यू
कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नऊ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. रितिका करोचिया असे दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे. रितिका ही घराजवळ खेळत असताना भटक्या कुत्र्याने तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला होता.

विवेकानंदनगर परिसरात राहणारी रितिका ही 4 मे रोजी घराजवळ खेळत होती. त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी कुत्र्याने तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा कडकडून चावा घेतला. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान दोन दिवसांपूर्वी तिची प्रकृती पुन्हा खालावल्याने तिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.