मोहोपाडा बस स्थानकाने घेतला मोकळा श्वास; बेकायदा शेड, टपऱ्या, हातगाड्या हटवल्या

रसायनी परिसरातील मोहोपाडा हे मुख्य बाजारपेठेचे गाव आहे. गावाच्या प्रवेशद्वारासमोर मासळी बाजार असल्याने गावात प्रवेश करताना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. शिवाय बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्याने बकालपणा वाढला आहे. यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. यानुसार ग्रामपंचायतीने बेकायदा शेड, टपऱ्या, हातगाड्या हटवल्या. यामुळे बस स्थानक आणि गावच्या प्रवेशद्वाराने मोकळा श्वास घेतला.

पंचशीलनगरहून मासळी बाजाराकडे येणारा सांडपाणी नाला वारंवार तुंबून पाणी रस्त्यावर येत असल्याने मासळी बाजाराच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शिवाय मोहोपाडा मैदानाजवळच्या पार्किंगला वाहने जात असताना बस थांब्याजवळील अतिक्रमण व समोरच उघड्यावर बसणारे मच्छी विक्रेते यामुळे मोहोपाडा प्रवेशद्वाराला बकाल स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून अतिक्रमणे आणि मासळी बाजार हटवा अशी मागणी केली होती. अतिक्रमणे हटवली नाही तर आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता, यानुसार ग्रामपंचायत अधिकारी वैभव पाटील यांनी मासळी विक्रेत्यांना नोटीस पाठवली होती. मासळी बाजाराची बिकट अवस्था पाहून सरपंच उमा मुंढे, सदस्या रसिका खराडे, प्रतीक्षा राऊत, आकाश जुईंकर, राकेश खराडे, माजी सरपंच रोशन राऊत यांनी पंचशील ते मासळी बाजार नाल्याचे खोदकाम करून अतिक्रमण केलेल्या शेड, टपरी, हातगाड्या हटवल्या.

दुर्गंधीमुळे ग्रामस्थ हैराण
बस थांब्याजवळील चिकन दुकान व उघड्यावर भरणारा मासळी बाजार कायमचा बंद करा, अशी मागणी वासांबे मोहोपाडा ग्रामस्थांनी केली आहे. दुर्गंधीमुळे बस थांब्यावर प्रवासी बसत नाहीत. ते रस्त्यावर थांबतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.