खड्डेच खड्डे चहुकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे? बोईसरच्या यादवनगरची अक्षरशः वाताहात

अवकाळी पावसाने बोईसरच्या यादवनगर परिसरातील रस्त्याची अक्षरशः वाताहात केली आहे. या रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने वाहनचालक व नागरिकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. विद्यार्थ्यांना तर चिखलातून वाट काढत शाळा गाठावी लागते. त्यामुळे खड्डेच खड्डे चहुकडे गं बाई गेला रस्ता कुणीकडे, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

यादवनगर परिसरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय व इतर राज्यातील लोकांचे वास्तव्य आहे. साधारण 5 ते 7 हजारांच्यावर याठिकाणी लोकवस्ती आहे. बोईसर ग्रामपंचायत क्षेत्रात हा भाग येतो. ग्रामपंचायतीने केलेल्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील रस्त्याची परिस्थिती जैसे थे आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. आम्ही जायचे कुठे, आम्ही कोणाकडे दाद मागायची, आम्हाला कोण न्याय देईल, असा सवाल यादवनगरवासीय विचारत आहेत.

विद्यार्थ्यांचा चिखलमय प्रवास
रघुवीर हायस्कूल विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालय तसेच 2 ते 3 शाळा यादवनगरमध्ये येतात. या शाळेमध्ये साधारण दोन ते अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेत जाताना विद्यार्थ्यांना चिखलमय रस्त्यातून वाट काढत शाळा गाठावी लागते. पावसाळ्यात शाळेत जाणे म्हणजे विद्यार्थ्यांना नकोसे होते. आम्हाला येण्यात जाण्यासाठी चांगला रस्ताच नाही. पावसाळ्यात इथे कोणी येऊ शकणार नाही इतकी दुर्गंधी या परिसरामध्ये असते, असे रहिवासी चंदा दुबे यांनी सांगितले.