पुतिन पूर्णपणे वेडे झाले आहेत असे म्हणत ट्रम्प संतापले, रशियाच्या पतनास हेच जबाबदार!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पूर्णपणे वेडे म्हटले आहे. व्लादिमीर पुतिन यांनी संपूर्ण युक्रेन जिंकण्याचा प्रयत्न केला तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल, असा इशाराच आता ट्रम्प यांनी दिला आहे. रविवारी रात्री त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यावरही टीका केली.

ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्याशी माझे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत, पण त्यांच्यासोबत काहीतरी घडले आहे. ते पूर्णपणे वेडे झाले आहेत! सध्या ते विनाकारण अनेक लोकांना मारत आहेत आणि मी फक्त सैनिकांबद्दल बोलत नाहीये.

ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये झेलेन्स्कीवरही टीका केली आणि म्हटले की, युक्रेनचे अध्यक्ष जसे बोलतात तसे बोलून त्यांच्या देशाचे काही भले करत नाहीत… त्यांच्या तोंडून निघणारी प्रत्येक गोष्ट समस्या निर्माण करते, मला ते आवडत नाही आणि ते थांबवणे चांगले.

चालता हो! पत्रकाराच्या प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भडकले, पत्रकारावर घेतले तोंडसुख

पुतिन यांच्यावर टीका करताना ट्रम्प म्हणाले, युक्रेनियन शहरांवर विनाकारण क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले जात आहेत. मी नेहमीच म्हटले आहे की, त्यांना संपूर्ण युक्रेन हवे आहे, फक्त त्याचा एक भाग नाही! परंतु जर त्यांनी तसे केले तर ते रशियाच्या पतनास कारणीभूत ठरेल! हे असे युद्ध आहे जे मी अध्यक्ष असतो तर कधीही सुरू झाले नसते. हे झेलेन्स्की, पुतिन आणि बायडेन यांचे युद्ध आहे, “ट्रम्पचे” नाही. मी फक्त घोर अक्षमता आणि द्वेषामुळे सुरू झालेली मोठी आणि अघटित आग विझवण्यास मदत करत आहे.”

रशियाने रविवारी रात्री युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांवर 367 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी बॉम्बहल्ला केला. हा आतापर्यंतचा युद्धातील सर्वात मोठा हवाई हल्ला होता. यात किमान 12 जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर जण जखमी झाले. या हल्ल्यानंतरच ट्रम्प यांनी पुतिनवर टीका केली.