
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडून गेले आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार 27 मे रोजी रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट तर 28 आणि 29 मे ला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवार 20 मे पासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घालायला सुरूवात केली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. गेले आठवडाभर मुसळधार पाऊस पडत असल्याने आता जिल्ह्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. सध्या जगबुडी नदी 6 मीटर पातळीवर वाहत आहे.
मंडणगडला सर्वाधिक पाऊस
गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 110.88 मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड 211.25 मिमी, खेड 85.85 मिमी,दापोली 144.28 मिमी, चिपळूण 123.66 मिमी, गुहागर 97.20 मिमी, संगमेश्वर 101.91 मिमी, रत्नागिरी 93.33मिमी, लांजा 81.20 मिमी, राजापूर 59.25 मिमी पावसाची नोंद झाली.