मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती चांदूरकर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींचे संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टीने सोमवारी तीन न्यायमूर्तीच्या नियुक्तीची शिफारस केली. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नाव सुचवण्यात आले आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अध्यक्षतेखालील कॉलेजियमने तीन न्यायमूर्तींच्या पदोन्नतीची शिफारस केली आहे.

न्यायमूर्ती अतुल चांदूरकर हे मागील काही वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयात न्यायदानाचे काम करत आहेत. त्यांच्या नियुक्तीने सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रीयन न्यायमूर्तींच्या संख्येत भर पडणार आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासह कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन व्ही अंजरीया, गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विजय बिष्णोई यांचीही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी शिफारस करण्यात आली आहे.

पाच न्यायमूर्तींना मुख्य न्यायमूर्ती करण्याची शिफारस

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तींची संख्या 34 असेत. मात्र सध्या सर्वोच्च न्यायालयात 31 न्यायमूर्ती कार्यरत आहेत. या तीन न्यायमूर्तींव्यतिरिक्त, कॉलेजियमने मध्य प्रदेश, कर्नाटक, गुवाहाटी, पाटणा आणि झारखंड या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तीपदी पाच उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.