भरपावसातही मुंबई पोलीस इन अ‍ॅक्शन नागरिकांना मदतीचा हात देत बजावले कर्तव्य

रविवारपासून बरसणाऱ्या पावसाने अक्षरशः दणादाण उडवून दिली. जोरदार कोसळणाऱ्या पावसाने शहरात आज ठिकठिकाणी पाणी तुंबले तर वाहतुकीचे तीनतेरा वाजवले होते. अशा कठीण परिस्थितीत मुंबई पोलीस मात्र सक्षमपणे नागरिकांची सेवा करताना दिसून आले. बंद पडलेल्या वाहनांना धक्का देऊन बाजूला काढणे, वृद्ध, लहानग्यांना साचलेल्या पाण्यातून सुखरूप नेणे, रस्ता खचला, भिंत पडली अशा ठिकाणावरून वाहतूक दुसरीकडून वळविताना मुंबई पोलीस दिसले.

पावसाने आज जोरदार बॅटिंग केली. पाऊस तुफान बरसल्याने सर्वांचीच दाणादाण उडाली. शहरातील नेहमीच्या ठिकाणी पाणी साचले, मेट्रो-3च्या भुयारी स्थानकातही पाणी साचले होते. यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेले लोक पाऊस कोंडीत सापडले होते. अशा वेळी मुंबई पोलीस त्यांच्या मदतीला धावले. साचलेल्या पाण्यात उभे राहून पोलीस नागरिकांना सुखरूप ठिकाणांहून जाण्याच्या सूचना करत होते. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून सुखरूप ठिकाणी घेऊन जात होते. साचलेल्या पाण्यात बंद पडलेल्या वाहनांना धक्का मारून बाजूला घेऊन जात होते. शिवाय अडचणीचे ठरेल अशा मार्गांवरील वाहतूक इतरत्र वळवून वाहतुकीचे योग्य नियोजन करताना पोलीस दिसले.

काम नसेल तर घराबाहेर पडू नका या पोलिसांच्या आवाहनाला नागरिकांनीदेखील साथ दिली. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत होते. केवळ नागरिकच नाही तर मुक्या प्राण्यांनादेखील पोलिसांनी सुखरूप ठिकाणी नेले. पोलिसांनी कुठलेही आढेवेढे न घेता चांगली कामगिरी केल्याने नागरिकांकडून त्यांचे समाज माध्यमांमधून कौतुक करण्यात आले.