
राज्यात ठिकठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत असतानाच पनवेलमध्येही तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन 200 बेड्सचे विलगीकरण कक्ष सुरू केले असून आरटीपीसीआरच्या चाचण्याही वाढवल्या आहेत.
रोडपली सेक्टर 17, खारघर सेक्टर 3 व 14 अशा तीन ठिकाणी कोरोनाची लागण झालेले रुग्ण सापडले. या तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या रुग्णांची माहिती मिळताच महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी रविवारी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत खारघरमधील वायएमटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निमिष रुग्णालयात 100 बेड्सचे विलगीकरण कक्ष, कळंबोली येथील पालिकेच्या रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेड्स व 6 अतिदक्षता बेड्स असलेला विभाग तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात 50 बेड्स आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात 50 बेड्स आरक्षित ठेवण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. या बैठकीत आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते आणि आरोग्य व स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
आरटीपीसीआर लॅब सुरू
आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी पालिकेकडे मोल एक्स्पर्ट लॅब उपलब्ध आहे. या लॅबमध्ये दररोज दीड हजार आरटीपीसीआर चाचण्या करण्याची क्षमता असून चाचण्यांसाठी लागणारी सर्व रसायने पालिकेकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे ही लॅब पालिकेने सुरू केल्याची माहिती उपायुक्त डॉ. विधाते यांनी दिली. या कोरोनासोबत दोन हात करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची सहाशेहून अधिक कर्मचाऱ्यांची टीम सज्ज झाली आहे.





























































