
पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने मुंबई शहरातील 96 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. या धोकादायक इमारतींमधील 2577 रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे आता केवळ 700 ते 750 संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित रहिवाशांचे स्थलांतर करायचे कुठे, असा प्रश्न आता प्रााधिकरणाला सतावत आहे.
मुंबईत सध्या 13 हजारहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. पावसाळय़ात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी दरवर्षी पावसाळय़ापूर्वी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. म्हाडाने जाहीर केलेल्या या 96 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये 2577 निवासी व 585 अनिवासी असे एकूण 3162 रहिवासी आहेत. त्यापैकी 2577 रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असून म्हाडाकडे सध्या केवळ 700 ते 750 संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध आहेत, अशी माहिती एका अधिकाऱयाने दिली.
दरमहा 20 हजार भाडय़ाचा पर्याय
धोकादायक इमारतींमधील रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी म्हाडाकडे संक्रमण शिबिराचे पुरेसे गाळे उपलब्ध नाहीत. त्यामुळे या रहिवाशांना दरमहा 20 हजार रुपये भाडे देण्याबाबतचा प्रस्ताव मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने म्हाडा उपाध्यक्षांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना भाडय़ाचा पर्यायदेखील उपलब्ध होणार आहे.