
जुने वीज मीटर बदलून नवीन डिजिटल स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा महावितरणने सुरू केला आहे. नागरिकांचा विरोध डावलून स्मार्ट मीटरची सक्ती केली जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बदलापुरात जोरदार आंदोलन केले. महावितरण कार्यालयाला अदानींच्या फोटोचे तोरण बांधून तीव्र संताप व्यक्त केला. यापुढे स्मार्ट मीटरची सक्ती केल्यास मीटर आणि महावितरणचे कार्यालयही फोडण्याचा इशारा आंदोलकांनी अधिकाऱ्यांना दिला.
आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख किशोर पाटील, प्रशांत पालांडे, स्वप्नील राजेशिंदे, प्रिया गवळी, दीपाली देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव, लक्ष्मण कुडव, असगर खान, दादासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, चिटणीस हेमंत रुमणे, प्रीतम वानखेडे, साक्षी दलाल आदींसह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला उद्योगपती गौतम अदानी तसेच ऊर्जामंत्र्यांच्या फोटोंचे तोरण बांधले. यावेळी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांच्या खुर्चीला अदानी यांचा फोटो चिकटविण्यात आला. तसेच राज्य सरकार आणि अदानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अधिकारी नरमले
बदलापुरात सध्या महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. महावितरणने अदानी कंपनीला हे वीज मीटर बसविण्याचे कंत्राट दिले आहे. ग्राहकांची पूर्वपरवानगी न घेता हे वीज मीटर बसविण्यात येत असून त्यानंतर अवाचे सवा बिले येण्याचे प्रकार वाढले आहेत. यापुढे ग्राहकांच्या संमतीशिवाय डिजिटल मीटर बसविले जाणार नाहीत वा त्यासाठी कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी आश्वासन महावितरणने आंदोलकांना दिले. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.


























































