
तालुक्यातील विविध ठिकाणी संस्थाचालकांनी शिक्षणाचा धंदा सुरू केला असून 13 बोगस शाळा आढळून आल्या आहेत. या शाळा त्वरित बंद कराव्यात, अशा नोटिसा पनवेल पंचायत समितीने बजावल्या आहेत. वारंवार नोटिसा बजावूनही शाळा बंद न केल्याने शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईमुळे शिक्षणमाफियांना दणका देण्यात आला आहे.
पनवेलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बोगस शाळा राजरोसपणे सुरूच आहेत. शिक्षण विभागाने याची दखल घेऊन या सर्व शाळांना नोटिसा बजावल्या असून विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची बाजूच्या शाळेमध्ये समायोजन करण्याचे आदेशदेखील पंचायत समितीने दिले आहेत. अनधिकृत शाळा चालवून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
… तर रोज दहा हजारांचा दंड
पनवेल तालुक्यात 13 बोगस शाळा आढळून आल्यानंतर पंचायत समितीने या शाळा चालवणाऱ्यांना नोटिसा बजावल्या. तसेच लवकरच अनधिकृत शाळा बंद न केल्यास व्यवस्थापनाला एक लाख किंवा दरदिवशी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.
या शाळेत प्रवेश घेऊ नका !
पनवेल तालुक्यातील या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे. नोटीस बजावण्यात आलेल्या शाळा: न्यू इंग्लिश स्कूल (नेरे), किड्स गार्डन पब्लिक स्कूल (टेमघर), एस.जी.टी. इंटरनॅशनल (करंजाडे, आर 1), साईगणेश एज्युकेशन सोसायटी नवजीवन इंटरनॅशनल स्कूल (खारपाडा), वेदिक ट्री इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे सेक्टर 3), वेदगृह इंटरनॅशनल स्कूल (करंजाडे सेक्टर 4), दि बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल (ओवळे), सनराईस इंग्लिश स्कूल (वावंजे), दि बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूल (आर 1, करंजाडे), कै. मंजुळा त्रिंबक (साखरेशेठ) ठाकूर इंग्रजी माध्यम शाळा (पाले बुद्रुक कोळवाडी), ज्ञानाई माध्यमिक विद्यालय (धामणी-वाजे), न्यू इंग्लिश स्कूल (कोपरा), आशाप्रभा न्यू इंग्लिश स्कूल (विचुंबे).