मी तर हिंदुस्थानचा मोठा चाहता; अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांकडून कौतुक, व्यापार कराराबाबत महत्त्वाचे संकेत

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून एकापाठोपाठ एक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत. त्यांच्या टॅरिफ धोरणामुळे जगभरात खळबळ उडाली होता. यामुळे हिंदुस्थान- अमेरिकेतही तणाव निर्माण झाला होता. त्यातच आता यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम या कार्यक्रमात अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी हिंदुस्थानचे कौतुक केले. दोन देशात तणावपूर्ण परिस्थिती असताना देखील त्यांनी हिंदुस्थानसोबतच्या संबंधांबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. लवकरच हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याची शक्यता व्यक्त केली.

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी वॉशिंग्टन डीसी येथे यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये हिंदुस्थानचे कौतुक केले. “मी हिंदुस्थान खूप मोठा चाहता आहे आणि हे हिंदुस्थानच्या सरकारलाही माहित आहे. माझे एक जवळचे मित्र, निकेश अरोरा, हिंदुस्थानी आहेत. मी जेव्हा हिंदुस्थानात जायचो, तेव्हा आम्ही घरी पार्ट्या करायचो, क्रिकेट खेळायचो आणि खूप मजा करायचो. हिंदुस्थानात घालवलेला वेळ माझ्यासाठी संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले.

हॉवर्ड लुटनिक यांनी दोन्ही देशांमधील व्यापार करारबाबतही मत व्यक्त केले. जे देश लवकरात लवकर कोणत्याही परिस्थिचीचा विचार करून त्यावर कृती करतात त्यांना चांगले करार मिळतात. मला वाटते की हिंदुस्थानही तेच करत आहे आणि मी त्याचे कौतुक करतो. पूर्वी असे करार होण्यासाठी दोन-तीन वर्षे लागायची, पण आता आम्ही ते एका महिन्यात कोणतेही महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटते की आम्ही खूप चांगल्या स्थितीत आहोत. अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्यात लवकरच व्यापार करार होऊ शकतो. आम्हाला दोन्ही देशांसाठी फायदेशीर मार्ग सापडला आहे, असे ते यावेळी म्हणाले.

“मजबूत संबंधांमुळे दोन देशांमधील व्यापार सुरळीत होतो”

हॉवर्ड लुटनिक पुढे म्हणाले की, मोदी आणि ट्रम्प यांच्यातील मजबूत राजकीय संबंधांमुळे दोन्ही देशांमधील व्यापारात अडचणी येत नाहीत. जेव्हा आपण याबाबत कोणतीही चर्चा सुरू करतो तेव्हा वातावरण सकारात्मक असते. यामुळे चर्चा लवकर आणि योग्य मार्गाने होते. आणि त्यामुळे कोणत्याही प्रसंगावर तोडगा लवकर निघतो, असे ते म्हणाले.