अबब.. वसईतील झाडाला 54 किलोचा फणस

फणस म्हटलं की, प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. मग तो कापा असो की बरका. त्याचा घमघमाट हा अनेकांना साद घालतो. सध्या फणसाचा हंगाम सुरू असून लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंतचे फणस बाजारात दिसू लागले आहेत. पण वसईच्या नाळा-वाळुंजे या गावात चमत्कार झाला आहे. येथील एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेत असलेल्या फणसाच्या झाडाला चक्क 54 किलो वजनाचा फणस लागला आहे. हा फणस पाहण्यासाठी वसई व परिसरातून हवशे नवशे गवशांची गर्दी होत आहे.

वाळुंजे गावातील प्रगतिशील शेतकरी आनंद पाटील यांची केळीची पारंपरिक बाग असून बांधावर त्यांनी आठ वर्षांपूर्वी फणसाची झाडे लावली होती. त्यातील एका झाडाला यंदा तीन फणस लागले. त्यातील एकाचे वजन 54 किलो 500 ग्रॅम एवढे भरले आहे. तर अन्य दोन फणसांचे वजनदेखील 30 ते 40 किलो आहे. मात्र वजनदार फणसाची सर्वत्र चर्चा सुरू असून याबाबत शेतकरी आनंद पाटील यांच्याकडे विचारणा केली जात आहे.

पोषक द्रव्ये आणि मुबलक पाणी
वाळुंजे गावात पाटील यांची सहा एकर राजळी आणि वेलची केळीची वाडी आहे. त्याच्या बांधावर पाच फणसाची कलमे लावली होती. त्यापैकी एका झाडाला तीन फणस लागले. सुरुवातीला फारसे कुतूहल नव्हते. पण गेल्या काही महिन्यांमध्ये फणसाचे आकारमान मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आणि त्याची चर्चा सुरू झाली. ही बागायती वाडी असल्याने फणसाच्या झाडाला योग्य प्रमाणात पाणी मिळाले तसेच आवश्यक असलेली पोषक द्रव्येदेखील झाडाला मिळाल्यामुळे मोठ्या वजनाचा फणस लागला असावा, असे पाटील यांचे म्हणणे आहे.