
आरेच्या जंगलात मेट्रो कारशेड उभारण्यासाठी शेकडो वर्षे जुनी हजारो झाडे कापली गेली. कुर्ला येथील मदर डेअरीची जमीन धारावी प्रकल्पाच्या नावावर अदानींना दिली गेली त्या जमिनीवरीलही हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. सरकारकडून पर्यावरणाची एकीकडे अशी हानी केली जात आहे आणि दुसरीकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दहा कोटी वृक्ष लागवडीची घोषणा केली.
‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ अभियानाअंतर्गत यंदाच्या वर्षी राज्यात 10 कोटी झाडे लावली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण आवश्यक आहे, असे ते म्हणाले. या वृक्षारोपणात किमान दीड ते तीन वर्षे वयाची रोपे लावण्यात यावीत. लावलेली झाडे टिकतील, वाढतील यासाठी प्रयत्न व्हावेत. तसेच लावलेल्या वृक्षारोपणाची जगण्याची टक्केवारी वाढावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच यासाठी रिमोट सेन्सिंग, उपग्रह आदी साधनांचाही वापर करून पारदर्शकपणे कामे होण्याकडे लक्ष द्यावे. राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच पालखी मार्गाच्या कडेला वृक्षारोपण करण्याच्या कामाची जबाबदारी आता वन विभागाकडे सोपविण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
म्हाडा दोन लाख झाडे लावणार
जुलै महिन्यात वन महोत्सव सप्ताहनिमित्त म्हाडातर्फे राज्यात सुमारे दोन लाख झाडांचे रोपण करणार आहे. यापैकी 50 हजार झाडे मुंबई महानगर प्रदेशात लावण्यात येणार आहेत, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. म्हाडाची मुंबई, कोकण अशा विभागीय मंडळांच्या अखत्यारीतील गृहनिर्माण वसाहतींच्या आवारात वृक्षारोपण करता येईल याचा अभ्यास करावा तसेच झाडांच्या देखभालीची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थांवर सोपवण्याच्या सूचना जयस्वाल यांनी केल्या. लागवड केल्या जाणाऱया सर्व झाडांना जिओ टॅग केले जाईल. म्हाडाच्या ज्या प्रकल्पांमध्ये झाडे तोडावी लागतील तिथे झाडांची पुनर्लागवड बंधनकारक करण्याबाबत परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार आहे.
मंत्रालयात कापडी पिशवी वेंडिंग मशीन, सिंगल यूज प्लॅस्टिकविरोधी मोहीम
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सिंगल यूज प्लॅस्टिकविरोधातील मोहिमेला गती देण्यासाठी मंत्रालयात कापडी पिशवी वेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून मंत्रालयातील सर्व विभागांना त्यांच्या कार्यालयात सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तू गोळा करून जमा करण्यास सांगण्यात आले आहे. राज्याच्या पर्यावरण विभागाच्या वतीने दररोज मंत्रालयात येणाऱया व्हिजिटर्ससाठी प्रात्यक्षिक म्हणून 5 जून रोजी कापडी पिशवी वेंडिंग मशीन लावली जाणार आहे.
यासंदर्भात मंगळवारी आदेश जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व विभागांना मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात सिंगल यूज प्लॅस्टिकच्या वस्तू जमा करण्यास सांगितलेय. पर्यावरण विभागाने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि बीड जिह्यातील परळी वैजनाथ येथील मंदिरासह प्रमुख ठिकाणी कापडी पिशवी विकणारी वेंडिंग मशीन याआधीच बसवल्या आहेत. या मशीन्सद्वारे पर्यावरणपूरक कापडी पिशव्या 10 रुपयांना मिळत आहेत. कापडी पिशव्यांमुळे प्लॅस्टिक पिशव्यांना शाश्वत पर्यायांना प्रोत्साहन मिळतेय. तसेच कापडी पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होत नाहीत.