वांद्र्यात दीड वर्षाच्या मुलाला वाहनाची धडक

वाहनाने दीड वर्षाच्या मुलाला धडक देऊन त्याला जखमी केल्याची घटना खेरवाडी परिसरात घडली. त्या धडकेत मुलाच्या डोक्याला, डोळय़ाला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गणेश पवार हे मूळचे धाराशीवचे रहिवासी आहेत. ते बिगारीचे काम करत असून सध्या खेरवाडी ब्रिजजवळ राहतात. त्यांना एक दशरथ नावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे. मंगळवारी गणेश हे पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत वांद्रे पूर्वच्या विजयनगर येथे जाणारे गटार साफ करत होते. तेव्हा दशरथ हा विजयनगर येथील एका दुकानासमोर खेळत असताना वाहनचालकाने दशरथला धडक दिली. या प्रकरणी गणेश याने खेरवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. गणेशच्या तक्रारीवरून पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंद केला.