
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे यांचे खासम्खास म्हणून ओळखले जाणारे पण तेवढेच वादग्रस्त ठरलेले अप्पर जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे यांची फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातून (एमएमआरडीए) उचलबांगडी केली आहे.
पद्माकर रोकडे हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे समजले जात असले तरी नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांना न जुमानता स्वतःच्या स्वार्थाला प्राधान्य दिले होते. मेट्रो रेल्वेच्या मार्गिका 8, 9 आणि 10 मधील भूमी अधिग्रहण आणि पुनर्वसनाची जबाबदारी रोकडे यांच्याकडे होती. त्याचसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश न पाळल्याने त्यांच्या तक्रारी वरपर्यंत गेल्या होत्या. वर्षभरापूर्वीच रोकडे यांच्याकडे सामाजिक विकास कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडे उच्च तक्रार निवारण समितीचे प्रमुखपद देण्यात आले होते.
आता एमएसआरडीसीत घुसण्यासाठी सेटिंग
पद्माकर रोकडे यांनी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळात (एमएसआरडीसी) घुसण्यासाठी सेटिंग लावली आहे. त्यासाठी सत्ताधारी पक्षातील मिंधे गटाचा एक आमदार त्यांना मदत करत असल्याची चर्चा आहे.