
कुर्ला येथील दुग्धशाळेचा 21 एकरचा भूखंड अदानीला दिला असताना आता मुंबई महापालिकेच्या 64 भूखंडांवर होणाऱया झोपडय़ांच्या पुनर्विकासातही अदानी समूहाला झुकते माप मिळण्याची शक्यता आहे. आधीच मुंबई महापालिकेचे सहा भूखंड सरकारने धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला देण्याचे प्रस्तावित आहे. त्यात आता 64 भूखंडाचे आयते कुरणही अदानीला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जून अखेरपर्यंत या पुनर्विकासाबाबत निविदा काढल्या जाणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या 64 भूखंडांवर असलेल्या झोपडपट्टय़ांचा पुनर्विकास मुंबई महापालिका स्वतः करणार होती, मात्र आता महापालिकेने या 64 एसआरए स्कीम बडय़ा बांधकाम कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचे ठरवले असून 25 टक्क्यांहून जास्त प्रीमिअम देणाऱया विकासकाला हे पुनर्विकास प्रकल्प दिले जाणार आहेत, मात्र 64 भूखंडांवरील पुनर्विकासात अदानीसह मोठय़ा विकासकांनी उत्सुकता दाखवल्यामुळे हा सर्व खटाटोप हे भूखंड अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
विशेष कक्ष स्थापन
मुंबई महापालिकेच्या मालकीच्या 64 भूखंडांवरील झोपडय़ांच्या पुनर्विकासात समन्वय साधण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षासाठी सहा पालिका अधिकारी-कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली असून त्यांच्यामार्फत पुनर्विकासाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
अदानीसह 40 हून जास्त विकासक उत्सुक
मुंबई महापालिकेच्या 64 भूखंडावरील झोपडय़ांचा पुनर्विकास पालिकेकडून केला जाणार होता. पालिकेने त्यासाठी म्हाडाला विचारले होते, मात्र म्हाडाने त्यात उत्सुकता दाखवली नाही. त्यामुळे शेवटी यासाठी खुल्या पद्धतीने निविदा मागवल्या जाणार आहेत. या निविदा प्रक्रियेत अदानी रिऑलिटी, वाधवा ग्रुप, रुस्तमजी यासारख्या 40 मोठय़ा विकासकांनी रुची घेतली आहे.