पोटच्या मुलीवर प्रियकरासह मित्रांना सामूहिक बलात्कार करायला लावला; भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्यक्षाला अटक

आई आणि मुलीचे नाते हे विश्वासाचे, प्रेमाचे, आपुलकीचे असते. कुठल्याही मुलीला आपल्या आईजवळ अधिक सुरक्षित वाटते. पण याच नात्याला कलंक लावणारी घटना हरिद्वार येथे घडली आहे. येथे एका महिलेने आपल्या प्रियकर आणि मित्रांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायला लावला आहे. ही घटना समोर आल्यानंतर पोलीसही हैराण झाले असून या प्रकरणी पोलिसांनी भाजपच्या महिला मोर्चाच्या माजी जिल्हाध्याक्षासह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. अनामिका शर्मा असे आरोपी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी भाजपने अनामिका शर्मा यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

अनामिका शर्मा हिच्यावर एक वर्षांपूर्वीच महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. महिलांचा विकास, सक्षमीकरण यावर आवाज उठवत असतानाच ‘दिव्याखाली अंधार’ असल्याचे समोर आले. अनामिकाने तिचा प्रियकर आणि मित्रांना आपल्याच 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करायला लावला. विशेष म्हणजे बलात्कार होत असताना ती स्वत: तिथे उपस्थित होती.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस स्टेशनचे प्रभारी कमल मोहन भंडारी यांनी सांगितले की, याच वर्षी जानेवारी महिन्यात राणीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका भागात कारमध्ये पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला. यावेळी पीडितेची आईही तिथे उपस्थित होती. बलात्काराआधी आईने मुलीला व्होडकाही पाजला होता आणि त्यानंतर प्रियकर आणि मित्रांना तिच्यावर बलात्कार करायला लावला. त्याआधी आरोपींना मुलीच्या आईनेच लिफ्ट दिली होती आणि हा प्रकार घडला तेव्हा गाडी जंगलामध्ये उभी केली होती.

या घटनेबाबत माहिती देताना पोलीस स्टेशनचे प्रभारी कमल मोहन भंडारी यांनी सांगितले की, याच वर्षी जानेवारी महिन्यात राणीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका भागात कारमध्ये पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला. यावेळी पीडितेची आईही तिथे उपस्थित होती. पीडिता आणि तिच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.

जानेवारी महिन्यामध्ये पीडितेची आई तिला फिरायला घेऊन गेली होती. याचवेळी तिने सुमित पटवाल आणि शुभम या मित्रांना गाडीमध्ये लिफ्ट दिली. त्यानंतर गाडी बीएचइएल मैदानाकडे नेली. तिथे पीडित मुलीला व्होडका पाजण्यात आला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. एवढेच नाही तर आग्रा, वृंदावन, हरिद्वार येथील हॉटेलमध्येही पीडितेवर अत्याचार करण्यात आला.

बलात्काराची घटना कुणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना जिवे ठार मारू अशी धमकी आरोपींनी दिली. मुलगी शांत शांत राहू लागल्याने वडिलांना संशय आला आणि त्यांनी तिला विश्वासात घेत विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. आता या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 245/25, 70(2), 351(3) 3(5) BNS आणि 3(क)/4(2), 5(l)/6, 16/17 पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात सर्व आरोप सत्य असल्याचे समोर आले असून पीडितेवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासातून स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेची आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. तर अन्य एकाचा शोध सुरू आहे.