
केस हा स्त्रियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी, स्त्री असो किंवा पुरुष या दोघांनीही काही गोष्टी लक्षात ठेवणे हे खूप गरजेचे आहे. सध्या मात्र आपण करिअरच्या धावपळीत आपल्या केसांकडे नीट लक्ष देऊ शकत नाहीये. यामुळे आपला केसांचा पोत हा खूप खराब होऊ लागला आहे. याकरता बाजारातील प्रोडक्टस मात्र केसांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत. अशा परिस्थितीत फक्त 8 रुपयांचे अंडे तुमच्यासाठी मोलाची भूमिका बजावणार आहे.

अंड्यापासून बनवलेल्या नैसर्गिक हेअर मास्कचा वापर करून, केस पातळ होण्यापासून आणि तुटण्यापासून सुटका होईल. तसेच अंड्यापासून बनवलेला हेअर मास्क केसांना पुरेसे पोषण देण्यास खूप मदत करतो. अंड्यांमध्ये प्रथिने, बायोटिन, जीवनसत्त्वे अ, ड आणि ई, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि ल्युटीन असतात. केसांना घनदाटपणा येण्यासाठी अंडे खूप गरजेचे आहे.
अंड्याचा हेअर मास्क लावण्याचे मुख्य फायदेअंडं हे केसांसाठी खूप गरजेचे आहे. अंड्यामुळे केस गळती रोखण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
पातळ केस असणाऱ्यांनी, अंड्याच्या मास्कचा नियमित वापर केल्यास केस घनदाट होण्यास मदत होते.
अंड्यामुळे केसातील कोंडा तसेच टाळूवरील खाज सुटण्याच्या समस्येपासून खूप आराम मिळतो.
अंडे केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी खूप मदत करते. मुख्य म्हणजे अंड्यामुळे केस रेशमी आणि मऊ मुलायम होतात.

अंड्याचा मास्क कसा बनवायचा?
हेअर मास्क बनवण्यासाठी, एका भांड्यात एक अंडे फोडा आणि ते चांगले फेटून घ्या. त्यात एक चमचा दही, एक चमचा ऑलिव्ह ऑइल आणि सुमारे अर्धा चमचा मध मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. आता हे मिश्रण ब्रश किंवा हातांनी केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा.
केसांना शॉवर कॅप किंवा टॉवेलने झाकून 30-40 मिनिटे तसेच ठेवा. केस थोडे सुकले की थंड पाणी आणि सौम्य शाम्पूने धुवा.
तुम्ही आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क लावू शकता. जर तुमचे केस खूप पातळ असतील तर तुम्ही ते दोनदा लावू शकता.

























































