5 रुपयांचा पारले-जी पुडा गाझात 2 हजार 342 रुपयांना, एक किलो साखर पाच हजाराला

गाझामधील अन्नटंचाईमुळे अनेक आवश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो साखरेची किंमत पाच हजारांपर्यंत पोहोचली आहे. तर एक किलो बटाटय़ाची किंमत दोन हजार रुपये झाली आहे. मोहम्मद जवाद यांनी आपल्या मुलीला पारले बिस्किट आणून दिल्यावर सोशल मीडियावर लिहिले, ‘खूप वाट पाहिल्यानंतर, मी शेवटी रविफसाठी तिचे आवडते बिस्किट आणले. या बिस्किटाची किंमत 24 युरोपर्यंत वाढली आहे. परंतु मी तिला तिचे आवडते बिस्किट नाकारू शकलो नाही,’ असे म्हटले आहे.

युद्धामुळे प्रचंड अन्नटंचाई, काळ्या बाजारात किंमती भडकल्या

इस्रायल आणि हमास यांच्यात 7 ऑक्टोबर 2023 ला सुरू झालेला संघर्ष पार टोकाला पोहोचला आहे. या दोन देशांतील युद्धामुळे गाझामध्ये अन्न आणि मूलभूत गरजांच्या वस्तूंची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. हिंदुस्थानात अवघ्या पाच रुपयाला मिळणारा पारले-जी बिस्कीटचा पुडा युद्धग्रस्त गाझा पट्टीत तब्बल 2342 रुपयांना विकला जात आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाझातील रहिवासी मोहम्मद जवाद यांनी आपल्या मुलीला आवडणाऱया एका बिस्कीट पुडय़ासाठी 24 युरो म्हणजेच जवळपास 2342 रुपये मोजले आहेत. यानंतर त्यांनी यासंबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून जगभरातून या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट येत आहेत. या व्हिडीओने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. इस्रायलने गाझावर बंदी घातली आहे. त्यामुळे मदत घेऊन जाणाऱया ट्रकांना गाझात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. गाझामध्ये पाच वर्षांखालील मुलांमध्ये कुषोषणाचे प्रमाण तिप्पटीने वाढले आहे. मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. गाझातील युद्धामुळे तसेच काळ्या बाजारामुळे एका पारले जी बिस्कीट पुडय़ाची किंमत 2342 रुपये झाल्याने गाझातील परिस्थिती किती गंभीर बनली आहे, हे स्पष्ट होत आहे.