
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात निर्माण झालेला तणाव आता राजकीय कुरघोडीमध्ये बदलताना दिसत आहे. मस्क-ट्रम्प यांच्या वादात आता थेट रशियाने उडी घेतल्याचे दिसत आहे. रशियातील एका ज्येष्ठ खासदाराने एलॉन मस्क यांना राजकीय आश्रय देण्याची ऑफर देऊ केली आहे. या ऑफरमुळे रशिया डोनाल्ड ट्रम्प यांना चांगलेच कोंडीत पकडणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कशामुळे पडली मैत्रीत फूट
डोनाल्ड ट्रम्प यांनी मे महिन्यात ‘बिग ब्युटीफुल बिल’ नावाचे कर विधेयक आणल्याने या दोन मित्रांच्या मैत्रीमध्ये फूट पडलीय. या विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहनांना देण्यात येणाऱया अनुदानात कपात केली जाणार असून याचा सर्वात मोठा फटका मस्क यांना बसणार आहे. त्यामुळेच मस्क यांचा राग अनावर झाला अन् त्यांनी रागाच्या भरात ट्रम्प यांच्या विरोधात एकापाठोपाठ एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली.
नवा पक्ष स्थापन करणार
जिगरी मित्र ट्रम्प यांना धडा शिकवण्यासाठी मस्क यांनी नवा पक्ष काढण्याची तयारी केली आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली असून यात म्हटलेय की, नवीन पक्ष स्थापन करण्याची वेळ आली आहे. यासाठी त्यांनी त्यांच्या नव्या पक्षाचे नाव ‘द अमेरिका पार्टी’ असेल, असे संकेतसुद्धा दिले आहेत. त्यांच्या या पोस्टला अमेरिकेतील 80 टक्के जनतेने सहमती दर्शवत त्यांच्या बाजूने कौल दिलाय.
…तर मस्क यांनी रशियात यावे!
खासदार, रशियाच्या आंतरराष्ट्रीय प्रकरणातील स्टेट डुमा समितीचे उपाध्यक्ष दिमित्री नोविकोव यांनी रशियाच्या सरकारी न्यूज एजन्सी ‘टीएएसएस’शी बोलताना म्हटले की, मस्क यांना अमेरिकेत अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांनी रशियात यावे. या ठिकाणी त्यांना विश्वासासोबत टेक्निकल क्रिएटिव्हिटीचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले जाईल, असे म्हटले आहे. खरं म्हणजे मस्क यांना राजकीय आश्रयाची गरज पडल्यास रशिया निश्चितपणे त्यांना राजकीय आश्रय देऊ शकतो. यासाठी त्यांनी एडवर्ड स्नोडन यांना दिलेल्या आश्रयाचा हवालासुद्धा दिलाय. रशियाने देऊ केलेले राजकीय आश्रयाचे विधान अशावेळी आले आहे, ज्यावेळी अमेरिकेत राजकीय उलथापालथ होत आहे. ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बेनन यांनी मस्क यांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची भाषा केली असून त्यांची कंपनी स्पेस एक्स जप्त करण्याची मागणी केलेली आहे. बेनन यांच्या धमकीला उत्तर म्हणून मस्क यांनीही आपल्या ड्रगन स्पेसक्राफ्टला जे नासा आणि आयएसएस यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे त्याला बंद करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेची चिंता वाढली आहे.