
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘आदित्य चषक’ 18 वर्षांखालील (मुले व मुली) राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 14 ते 18 जून या कालावधीत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेतील विजेते दोन्ही संघ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असल्याची माहिती स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवशक्ती महिला संघाच्या वतीने ‘आदित्य चषक’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील युवा कबड्डीपटूंसाठी राष्ट्रीय कबड्डी संघात स्थान मिळवण्याच्या दृष्टीने या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील सर्वच जिह्यातील संघ जोरदार तयारीनिशी उतरतात. या चढाई-पकडींच्या संघर्षाचा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 14 जूनला सायंकाळी 6 वाजता युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत व आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल.
या स्पर्धेसाठी राज्यातील 25 जिह्यांमधील मुलांचे 31 आणि मुलींचे 31 संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील सर्व सामने बंदिस्त क्रीडा संकुलात चार मॅटच्या क्रीडांगणावर साखळी पद्धतीने होणार आहेत. सर्व सामने सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात खेळवले जाणार आहेत. स्पर्धेतील विजेते संघ उत्तर प्रदेशमधील हरिद्वार येथे 28 जून ते 1 जुलै या कालावधीत होणाऱया 18 वर्षांखालील राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. पुण्यात पार पडणाऱया निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणाऱया एक हजार खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पंच, विविध समित्यांमधील प्रतिनिधीची भोजन-निवास व्यवस्था क्रीडा संकुलात करण्यात आली आहे.
शरीरसौष्ठव, कॅरम, टेबल टेनिससह विविध स्पर्धांचे आयोजन
‘आदित्य चषक’ कबड्डी स्पर्धेबरोबरच शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, कॅरम, टेबल टेनिस यांसारख्या विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार आहे. राजकारणाच्या व्यतिरिक्त सामाजिक जाणीव म्हणून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार सचिन अहिर यांनी दिली. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आमदार बाबाजी काळे, बापूसाहेब पठारे हे मेहनत घेत आहेत.
बहरीनच्या युवा स्पर्धेची तयारी
2026 मध्ये बहरीन येथे तिसरी युवा क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यात 14 ते 18 वर्षे वयोगटातील तब्बल 2000 पेक्षा अधिक खेळाडू 45 खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवतील. या स्पर्धेत कबड्डीचाही समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघाने प्रत्येक राज्याला राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करण्याचे कळवले आहे. त्यानुसार प्रथमच महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने 18 वर्षांखालील कबड्डीपटूंच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतून महाराष्ट्राचे युवा आणि युवतींचे दोन संघ निवडले जातील आणि ते हरिद्वार येथे होणाऱया राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती बाबुराव चांदेरे यांनी दिली.
n स्पर्धेत सहभागी होणारे जिल्हे (मुले व मुली) ः मुंबई शहर पूर्व, मुंबई शहर पश्चिम, मुंबई उपनगर पूर्व, मुंबई उपनगर पश्चिम, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे शहर, पुणे ग्रामीण,पिंपरी-चिंचवड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, जळगाव, धुळे, बीड, धाराशीव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, सोलापूर, हिंगोली, नंदुरबार, पालघर.