56 किलो गांजा जप्त

गांजा तस्करीसाठी आलेल्या दोघांना क्राईम ब्रँच युनिट 9 ने बेडय़ा ठोकल्या. वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील अधिकाऱयाने ही कारवाई केली. सोमेश भिकूलाल मुंगसे आणि बाळू खिल्लारे अशी त्या दोघांची नावे आहेत. ते दोघे जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहेत. पोलिसांनी कारवाई करून गांजा आणि एक गाडी जप्त केली आहे. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.

जुहू परिसरात काही जण गांजाच्या डिलिव्हरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट 9 ला मिळाली. त्या माहितीची सत्यता पडताळली. वरिष्ठ निरीक्षक दया नायक आणि पथकाने सापळा रचला. शनिवारी रात्री जुहू परिसरातल्या आहुजा रोड येथे दोन जण गाडीतून उतरले. त्यांच्याकडे चार बॅग होत्या. त्या बॅग पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्या बॅगेत 56 किलो गांजा होता.

जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे चौदा लाख रुपये इतकी आहे. त्या दोघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी युनिट कार्यालयात आणले.

  • सोमेश हा डान्सर असून तो छत्रपती संभाजीनगर येथे राहतो. त्याच्याविरोधात वालूज येथे पोक्सो आणि तेलंगणा येथे उत्पादन शुल्क येथे दोन गुन्हे नोंद आहेत, तर बाळू हा लातूरच्या भोकरदनचा रहिवासी असून तो मजुरीचे काम करतो. ते दोघे गांजा डिलिव्हरीसाठी आले होते. त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याना अटक केली.