
मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बस अपघातानंतर टँकरमध्ये वायुगळती झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक 17 तास ठप्प होती. रात्री 1 वाजता बावनदी येथील वाहतूक सुरू करण्यात आली. सध्या पाच जखमींवर शासकीय आणि पाच जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले आहे.
चिपळूणहून रत्नागिरीकडे प्रशिक्षणासाठी जाणाऱया शिक्षकांच्या मिनी बसला समोरून येणाऱया एलपीजी गॅस टँकरने धडक दिली. या अपघातानंतर मिनी बस वीस फूट दरीत कोसळली. या अपघातात मिनी बसमधील तीस जण जखमी झाले होते. गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या वायुगळतीमुळे परिसरात आग लागली. यात रस्ते रुंदीकरणात गेलेली दोन बंद घरे जळाली. गॅस टँकरमधून वायुगळती होत असल्याने सुरक्षेसाठी रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात आला. गोव्याकडे जाणारी वाहतूक संगमेश्वर मार्गे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पाली व उक्षी मार्गे वळविण्यात आली होती.
पाच जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
रविवारी झालेल्या अपघातात तीस जण जखमी झाले होते. त्यापैकी आठ जणांवर प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले होते. 22 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. त्यापैकी तीन रुग्णांना चिरायू हॉस्पिटलमध्ये, दोघांना परकार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परकारमधील एका रुग्णाला पुण्यात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. उर्वरित जखमींना उपचारानंतर सोडण्यात आले.
दोन बॅगा आणि मोबाईल सापडला
गॅस टँकरने समोरून दिलेली धडक इतकी जोरदार होती की मिनी बसमधील वस्तू बाहेर फेकल्या गेल्या. आज स्थानिक ग्रामस्थांनी त्या परिसरात जाऊन पाहणी केल्यानंतर तिथे दोन बॅगा, मोबाईल आणि एक फोल्डर सापडला.
शिक्षक संघटनेची मदत
निवळी येथे शिक्षकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी कळताच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मदतीसाठी धावला. संघटनेचे सचिव संतोष रावणंग हे दिवसभर घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी पोलिसांनाही मदत केली. संघटनेच्या काही पदाधिकाऱयांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.