
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवल्याने मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला असला तरी मंडळांच्या मोठमोठय़ा मूर्तींचे विसर्जन कसे करणार, असा सवाल निर्माण झाला आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती तब्बल 30 फुटांपर्यंत असतात. अशा मूर्तींचे विसर्जन कृत्रीम तलावात करणे अशक्य असल्याचे स्पष्ट असल्यामुळे पालिका काय उपाययोजना करते याकडे लक्ष लागले आहे.
मुंबईत सुमारे बारा हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत, तर सवा दोन लाख घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो. बारा हजार सार्वजनिक मंडळांपैकी सुमारे तीन हजार मंडळे रस्त्याच्या बाजूला किंवा मोकळय़ा जागेत मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. यासाठी पालिकेकडून मंडळांना रीतसर परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी पालिकेने ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ऑफलाइनची सुविधाही वॉर्ड ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
या निर्णयामुळे पीओपीच्या मूर्ती बनवण्यास परवानगी मिळाली असली तरी मोठय़ा मूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे मंडळांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विसर्जनासाठी प्रशासनाकडून सक्षम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. – नरेश दहिबावकर, अध्यक्ष, गणेशोत्सव समिती
सरकारने जसे पीओपी मूर्ती बनवण्यास परवानगी दिली. तसाच मोठय़ा मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा निर्माण करून देण्याची अपेक्षा आहेत. अन्यथा मोठय़ा मूर्तींच्या विसर्जनावरून वाद होण्याची शक्यता आहे. – स्वप्नील परब, गणेशगल्ली, मुंबईचा राजा