
72 वर्षीय आजारी वडिलांचे पालक होण्यास उच्च न्यायालयाने मुलांना परवानगी दिली आहे. त्यामुळे मुले वडिलांचे सर्व व्यवहार अधिकृतपणे हाताळू शकतील.
वैभव उंचल व त्यांची बहीण वंदना यांनी ही याचिका केली होती. वडील रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोकाला दुखापत झाली. ते स्वतःचे दैनंदिन काम करू शकत नाही. आम्ही त्यांची योग्य ती काळजी घेत आहोत. मात्र वडिलांचा पालक म्हणून नियुक्त करण्यास न्यायालयाने परवानगगी द्यावी, जेणेकरून त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार व अन्य कागदोपत्री कामे करता येतील, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. अपघातात वैभव यांच्या वडिलांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आहे. परिणामी त्यांना नीट बोलता येत नाही. गोष्टी त्यांच्या लक्षात राहत नाहीत. ते कोणताही आर्थिक निर्णय घेऊ शकत नाहीत, असा वैद्यकीय तपासणी अहवाल न्यायालयात सादर झाला. त्याची नोंद करून घेत खंडपीठाने मुलांची वडिलांचे पालक म्हणून नियुक्तीस परवानगी दिली.
12 बँक खाती व घर
वैभव यांच्या वडिलांची 12 बँक खाती आहेत. त्यांचे वरळीत घर आहे. याबाबतची सर्व कार्यवाही वैभव व त्यांची बहीण करू शकते. मात्र वडिलांचे घर ते विकू शकत नाहीत. वडिलांच्या उपचारासाठी घर विक्रीचा निर्णय घ्यायचा असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.