
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत डॉ. प्रतिक जोशी यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडले आहे. प्रतिक जोशी यांची पत्नी डॉ. कोमी व्यास आणि तीन चिमुकली मुलं दोन जुळे मुलगे नकुल आणि प्रद्युम्न आणि एक मुलगी मिराया यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
गेली सहा वर्ष लंडनमध्ये प्रॅक्टिस करत असलेले डॉ. प्रतीक जोशी हे आठवडाभरापूर्वीच पत्नी व मुलांना तिथे घेऊन जाण्यासाठी आले होते. सहा वर्षांपासून ते आपल्या कुटुंबाला लंडनला नेण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर यावर्षी ते कुटुंबाला घेऊन जात होते. डॉ. कोमी व्यास यांनी दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या उदयपूरमधील नोकरीचा राजीनामा दिला होता व त्या त्यांच्या पतीसह लंडनला स्थायिक व्हायला निघाल्या होत्या.
कुटुंबियांचा व नातेवाईकांचा निरोप घेऊन जोशी कुटुंब विमानात बसले. विमानात पती पत्नी शेजारी शेजारी बसले व तिन्ही मुलांना शेजारी शेजारी बसवले. डॉ. जोशी यांनी त्यांच्या कुटुंबाचा विमानतला सेल्फीही काढला व आपल्या नातेवाईकांना पाठवला. मात्र काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. विमान दुर्घटनेत जोशी कुटुंबातील पाचही जणांचा मृत्यू झाला.