मुंबई टी-20 लीगमुळे होतकरू खेळाडूंना मिळाला प्लॅटफॉर्म! ‘आयपीएल’मध्ये संधी मिळण्यासाठी होणार फायदा

मुंबई टी-20 लीग स्पर्धेत होतकरू खेळाडूंना चमकदार कामगिरी दाखवण्याची संधी मिळाल्याने आयपीएलसारख्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळाला आहे. मुंबई आणि परिसरातील आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये मराठा रॉयल्स संघाने विजय मिळवत चषकावर नाव कोरले.

मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि अपेक्स कौन्सिलच्या माध्यमातून ही टी-20 क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली. या स्पर्धेत केवळ मुंबईच नाही तर ठाणे, पालघर आदी ठिकाणच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. वानखेडे स्टेडियम आणि डी. वाय. पाटील मैदानावर ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेच्या फायनलमध्ये मराठा रॉयल्स टीमने विजय मिळवत चषक पटकावला.  या स्पर्धेसाठी 35 हजारांवर प्रेक्षक उपस्थित होते.

श्रेयस, सूर्याच्या समावेशाने उत्साह

या क्रिकेट स्पर्धेत मराठा रॉयल्स आणि सोबो टीम यांच्यात फायनल मॅच झाली. या लढतीत सोबो टीमकडून इंडियाचा धडाकेबाज खेळाडू श्रेयस अय्यर याने सहभाग घेतला. तर देशाच्या टी-20 टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही सहभाग घेतला. सूर्या आणि श्रेयसच्या समावेशामुळे दोन्ही टीममध्ये उत्साहाचे वातावरण होते. या क्रिकेट स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून स्पर्धेला चांगलाच प्रतिसाद वाढत असल्याचे मराठा रॉयल्सचे सुनील रमाणी यांनी सांगितले.