
दणक्यात सुरुवात करून मोक्याच्या वेळी कच खाण्याची सवय जडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाला क्रित्येक वर्षांपासून ‘चोकर्स’ म्हणून हिणवले जात होते. मात्र अखेर तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेने विजेतेपदाचा दुष्काळ संपवित चोकर्सचा शिक्काही पुसून टाकत इतिहास घडविला. गत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियावर अभूतपूर्व विजय मिळवित दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी क्रिकेटमधील नवा जगज्जेता ठरला. टेम्बा बवुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारत ऑस्ट्रेलियाचा चार दिवसांतच 5 गडी राखून पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. दुसऱ्या डावात 136 धावांची मॅरेथॉन खेळी करणारा एडेन मार्करम या जगज्जेतेपदाचा शिल्पकार ठरला.
मार्करम अन् बवुमाचा प्रतिकार
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 212 धावसंख्या उभारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची 138 धावांत दाणादाण उडवून पहिल्या डावात 74 धावांची आघाडी घेत कसोटी सामन्यावर पकड मिळविली होती. ऑस्ट्रेलिया तिसऱ्याच दिवशी कसोटी संपविणार असे वाटत असताना दक्षिण आफ्रिकेने गत जगज्जेत्यांना दुसऱ्या डावात 207 धावांवर रोखून सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र जगज्जेते होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 282 धावांची गरज होती. पहिल्या डावात 138 धावसंख्येपर्यंत मजल मारलेल्या दक्षिण आफ्रिकेला हे आव्हान पेलवेल असे कोणालाच वाटत नव्हते. मात्र सलामीवीर एडेन मार्करम (136) आणि कर्णधार टेम्बा बवुमा (66) यांनी ऑस्ट्रेलियाच्या रथी-महारथी गोलंदाजांचा प्रतिकार करीत दक्षिण आफ्रिकेला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. 282 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावर 9 धावा असताना रायन रिकेल्टन (6) बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला यष्टीमागे पॅरीकरवी झेलबाद केले. मग धावफलकावर 70 धावा असताना विआन मुल्डर (27) बाद झाला. त्यालाही स्टार्कनेच लाबूशेनकरवी झेलबाद केले.
‘जेतेपदाची चव चाखण्यासाठी आम्ही खूप वाट पाहिली. या क्षणासाठी खूप मेहनत घेतली. गेल्या काही वर्षांत दक्षिण आफ्रिकेचा संघ अनेकदा जेतेपदाच्या दारापर्यंत जाऊन अपयशी ठरलो, मात्र या जेतेपदाने आता दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये सूर्योदय झाला आहे. हे जेतेपद एक सुरुवात असून कॅगिसो रबाडा व एडेन मार्करम यांनी मोक्याच्या वेळी आपली क्षमता दाखवून दिली. हे जगज्जेतेपद देशातील प्रत्येकासाठी भूषणावह आहे.’ < टेम्बा बवुमा (कर्णधार, दक्षिण आफ्रिका)
‘पहिल्या डावात आघाडी मिळवूनही ती टिकवू शकलो नाही. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात कोणतीही संधी दिली नाही. फलंदाजीत आमच्याकडून काही चुका झाल्या. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, लायनने विशेषतः खूप प्रयत्न केला. एडन आणि बवुमाने आम्हाला कोणतीही जागा दिली नाही. दक्षिण आफ्रिकेने जगज्जेतेपद मिळविले. त्याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. अंतिम निकाल आमच्या बाजूने लागला नसला तरीही हा आठवडा खूप संस्मरणीय ठरला.’ < पॅट कमिन्स (कर्णधार, ऑस्ट्रेलिया)