सात वर्षांचा हरवलेला आदर्श तीन तासांत आईवडिलांच्या कुशीत

लोणी पाडा येथे राहणारा सात वर्षीय आदर्श घराबाहेर खेळता-खेळता डहाणू रेल्वे स्थानकावर गेला. स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये तो चढला आणि थेट विरारला पोहोचला. मात्र डहाणू पोलीस, बालकल्याण समितीच्या दक्षतेमुळे अवघ्या तीन तासांत आदर्श आईवडिलांच्या कुशीत विसावला.

लोणी पाडा येथे विनोदकुमार सिसोदिया हे कुटुंबासह राहतात. त्यांचा सात वर्षांचा मुलगा आर्दश हा घराबाहेर खेळत होता आणि अचानक गायब झाला. नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर नातेवाईकांनी डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगा हरवल्याची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी विविध पथके तैनात केली. परिसरात व सोशल मीडियावरही मुलाबाबत माहिती पसरवण्यात आली. घराबाहेर खेळताना आदर्श डहाणू स्थानकात पोहोचला आणि स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये बसून विरार स्टेशनवर उतरला.

पालकांचा जीव भांड्यात पडला
विरार पोलिसांनी आर्दशला शोधले आणि त्याला पालघर बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले. आदर्शला नरेशवाडी येथील गिरी वनवासी प्रगती मंडळ येथे ठेवण्यात आले होते. पोलिसांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधून तो सापडल्याची माहिती दिल्याने पालकांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी तत्काळ डहाणू पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलाला ताब्यात घेतले.