
येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने आंदोलन करणाऱ्या 16 आडत व्यापाऱ्यांना बजावलेल्या नोटिसा रद्द करा, कृउबा समितीमध्ये होत असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात आणि मनपाने येथील अवैध बांधकाम पाडावे, या मागणीसाठी उद्या मंगळवारी दुपारी 3 वाजता मनपासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.
परवानगी नसताना कृषी उत्पन्न बाजार समिती अनधिकृत बांधकाम करीत आहे. या विरोधात आवाज उठविला व दोन दिवसांचे आंदोलन केले. आंदोलन करणे गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल आडत व्यापाऱ्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत विचारला. याविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीने धान्याच्या आडत बाजारातील 8 तर फळ व भाजीपाला बाजारातील 8, अशा 16 आडत्यांना 10 जून रोजी नोटीस बजावली आहे. त्यामुळे आडत व्यापाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात धान्य आडत व्यापाऱ्यांतर्फे राकेश सोनी यांनी सांगितले की, मनपाची परवानगी नसताना सेल हॉल क्र. 5 च्या बाजूला पार्किंगच्या जागेवर झाडे तोडून कृउबा इमारत बांधत आहे. तिथे वसतिगृहाच्या नावाखाली दुकाने उभारली जात आहेत. वसतिगृहाला विरोध नसून अनधिकृत बांधकामाला विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तात्काळ नोटीस मागे घ्या, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशाराही आडत्यांनी दिला. यावेळी आडत व्यापारी हरीश पवार, संजय पहाडे, शिवलिंग गुळवे हे उपस्थित होते.
कृउबा समितीमध्ये होत असलेल्या गैरकारभाराच्या विरोधात आणि मनपाने येथील अवैध बांधकाम पाडावे, या मागणीसाठी उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता मनपासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी गटनेते नासेर सिद्दीकी यांनी केली.