संक्रमण शिबीर, उपकरप्राप्त इमारतीमधील रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा जनता दरबार गुरुवार, 26 जून रोजी दुपारी 11 ते 1 या दरम्यान वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील तिसऱ्या मजल्यावरील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात होणार आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून म्हाडा मुख्यालयात राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाप्रमाणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ जनता दरबार दिनाचे आयोजन करीत आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहरातील उपकरप्राप्त इमारती व मुंबई शहर, उपनगरातील संक्रमण शिबिरातील इमारती, गाळ्यांमधील नागरिकांनी या जनता दरबार दिनात आपल्या निवेदन, अर्ज व कागदपत्रांसह उपस्थित राहून आपले प्रश्न, समस्या मांडाव्यात, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.