
मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास गती दिली आहे. आतापर्यंत मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 25 लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांतून मोटरमनच्या हालचालींवर बारीक ‘वॉच’ ठेवला जात आहे. त्यामुळे मोटरमन कामगार संघटनांनी केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याला विरोध कायम ठेवला आहे.
मुंब्य्रातील अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने प्रवासी सुरक्षेसाठी विविध घोषणा केल्या. त्या घोषणा मूर्त रूपात येण्याआधी मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या कार्यवाहीला गती दिली आहे. मोटरमनकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होणे, लाल सिग्नल असताना गाडी पुढे नेणे असे प्रकार काही वेळेला घडतात. अशा प्रकारांमागील कारणे शोधण्यासाठी मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवले जात आहेत.
रेल्वे बोर्डाच्या निर्देशाकडे बोट दाखवत आणि प्रवासी सुरक्षेचे कारण पुढे करीत मध्य रेल्वेने आतापर्यंत 25 लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये प्रत्येकी सहा सीसीटीव्ही याप्रमाणे एकूण 150 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. एक कॅमेरा मोटरमन केबिनच्या दर्शनी भागावर लावला जात असून त्यातून ट्रेनच्या समोरील भागाचे चित्रण केले जात आहे, तर केबिनच्या आतील भागात दोन कॅमेरे बसवून त्याद्वारे मोटरमनच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. केबिनमध्ये बसवण्यात येत असलेल्या दोन कॅमेऱ्यांना मोटरमनच्या कामगार संघटनांकडून विरोध केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवतानाच मोटरमनला सिग्नलच्या ठिकाणी हाताने इशारा करण्याची सक्ती केली होती. त्याविरुद्ध आंदोलन केल्यानंतर हाताने इशारा करण्याचे बंधन हटवले. त्याच वेळी सीसीटीव्हींच्या माध्यमातून मोटरमनवर कारवाई करणार नसल्याची हमी प्रशासनाने दिली होती. असे असताना रेल्वेने जर पुन्हा मोटरमनवर कारवाईसाठी सीसीटीव्हीचा वापर केला, तर रेल कामगार सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रेल कामगार सेना कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी दिला.