
लीड्सवर बॅझबॉल जिंकला. हिंदुस्थानचे 371 धावांचे जबरदस्त आणि अवघड आव्हानही इंग्लंडने आपल्या आक्रमक वृत्तीच्या बॅझबॉलमुळे पाच विकेटनी जिंकत पहिला कसोटी सामना आपल्या खिशात घातला. बेन डकेटच्या 149 खेळीने हिंदुस्थानच्या विजयावर दरोडा घातला. डकेट आणि झॅक क्रावली या सलामीवीरांनी 188 धावांच्या तुफानी आणि बिनधास्त भागीने हिंदुस्थानच्या हातावर असलेली विजयाची रेषाच पुसून टाकली. अधूनमधून येणारा पाऊस आणि अंधाराची माया आज हिंदुस्थानला लाभली नाही. परिणामतः हिंदुस्थानच्या नव्या पर्वाचा शुभ आरंभ होऊ शकला नाही. अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाच कसोटी सामन्यांच्या युद्धातील पहिली लढाई इंग्लंडने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. आता दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून बार्ंमगहमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर खेळविला जाईल.
कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात 350 धावांचे आव्हान खूप मोठी गोष्ट असते; पण बेन स्टोक्स आणि ब्रॅण्डन मॅकलम यांच्या बिनधास्त बेधडक बॅझबॉल खेळाने कसोटीचा क्लायमॅक्स अपेक्षेप्रमाणे थरारक केला. बेन स्टोक्सचा रिव्हर्स स्वीपचा फटका चुकल्यामुळे इंग्लंडने पाचवा विकेट गमावला आणि हिंदुस्थानी गोटात आनंदाचे वातावरण पसरले; पण इंग्लंडच्या फलंदाजीचा कणा असलेला ज्यो रुट पुन्हा एकदा संघाच्या विजयासाठी उभा राहिला आणि त्याने जॅमी स्मिथच्या साथीने विजयी लक्ष्य 82 व्या षटकातच गाठले. 81 व्या षटकात नवा चेंडू घेतल्यानंतर गिलने बुमराच्या ऐवजी जाडेजाच्या हातात चेंडू दिला. पण स्मिथने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकत सामनाच संपवला. नव्या चेंडूंवर गोलंदाजी करण्याचे भाग्य बुमराला लाभलेच नाही. रुटने 53 तर स्मिथने 44 धावा फटकावल्या. पहिल्या डावात 62 आणि दुसऱया डावात 149 अशा 211 धावा करणारा डकेटच इंग्लंडच्या विजयाचा सामनावीर ठरला.
सलामीवीरांनी हिंदुस्थानला मागे टाकले
बेन डकेट आणि झॅक क्रावली या सलामीवीरांनी हिंदुस्थानी गोलंदाजांना एका विकेटसाठी अक्षरशः पहिले सत्र झुंजवले. बुमरा आणि बॅझबॉलच्या संघर्षात पहिले सत्र बॅझबॉलनेच गाजवले. डकेटने हिंदुस्थानी गोलंदाजीला अक्षरशः पह्डून काढताना पहिल्या सत्रात 96 धावा काढल्या. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने बिनबाद 117 अशी मजल मारत विजयाच्या दिशेने जोरदार धाव घेतली होती. उपाहारानंतर डकेट आणखीच आक्रमक झाला. त्याने चौकारांची बरसात करत 121व्या चेंडूवरच आपले सहावे शतक साकारले. त्याने या खेळीत 14 चौकारांची बरसात केली. पहिल्या सत्रात अभेद्य असलेल्या सलामीवीरांनी दुसऱया सत्रातही खणखणीत खेळ करत 371 धावांचा वेगवान पाठलाग केला. अखेर 188 धावांवर प्रसिध कृष्णाने हिंदुस्थानला पहिले यश मिळवून आशेची पहिली ज्योत पेटवली. क्रावली 65 धावांवर बाद झाला.
कृष्णाने जिवात जीव आणला
इंग्लंडचे सलामीवीर अक्षरशः तुटून पडले होते. कसोटीत वन डे क्रिकेटचा आनंद लुटून ते बॅझबॉल क्रिकेट खेळले. ही जोडी सहज 200 धावांची भागीही रचणार असे वाटत होते. फलकावर 188 धावा लागल्या होत्या. तेव्हा प्रसिधच्या एका आऊटस्विंगने क्रावलीला स्लिपमध्ये उभ्या असलेल्या राहुलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. एकदाची सलामीची जोडी फुटल्यामुळे हिंदुस्थानच्या जिवात जीव आला होता. त्यानंतर पुढच्याच षटकात प्रसिधनेच पहिल्या डावातील झुंजार शतकवीर ऑली पोपची यष्टी वाकवून सनसनाटी निर्माण केली. सलग षटकांत दोन हादऱयांमुळे हिंदुस्थान पुन्हा सामन्यात आला. त्यानंतर डकेटच्या फटकेबाजीने इंग्लंडला 253 पर्यंत नेले. दुसऱया बाजूने ज्यो रुट उभा होता. तेव्हा पहिल्या डावात एकही विकेट घेऊ न शकलेल्या शार्दुल ठाकूरने बेन डकेटचे स्टंप उखडले. शतकावर त्याला जीवदान लाभले होते, पण त्याचे दीडशतक पूर्ण होऊ शकले नाही. 170 चेंडूंत 149 धावा करत त्याने आपले काम चोख बजावले. मग पुढच्याच चेंडूवर हॅरी ब्रूकची विकेट काढत ठाकूरने कहर केला. शार्दुलला हॅटट्रिकचीही संधी होती, पण कर्णधार बेन स्टोक्सने ती होऊ दिली नाही. या दोन हादऱयांमुळे हिंदुस्थानने आपले विजयाचे प्रयत्न आणखी तीव्र केले.
पाचव्या दिवशी 350 धावांचा यशस्वी पाठलाग
एखाद्या अॅक्शनपटाप्रमाणे हेडिंग्लेवर 350 धावांचा पाठलाग सुरू होता. डकेट-क्रावलीच्या भागीमुळे इंग्लंडने कसोटीवर पकड घेतली होती, पण हिंदुस्थानने झटपट चार विकेट काढत सामन्याला वळण दिले. पण अखेर रुट-स्मिथने विजयी लक्ष्य 82व्या षटकातच गाठत 50 मिनिटे आधीच संघाच्या ऐतिहासिक पाठलाग विजयावर शिक्कामोर्तब केले. पाचव्या दिवशी 350 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची ही दुसरीच वेळ आहे. याआधी 1948 साली ऑस्ट्रेलियाने हेडिंग्लेवर शेवटच्या दिवशी 404 धावा काढत विजय मिळवला होता. हेडिंग्लेवर इंग्लंडने सलग सहावा विजय मिळवला. गेल्या तीन कसोटींत तर त्यांनी 250 पेक्षा अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे.
जैसवालने सामना फिरवला
एकीकडे इंग्लंडची सलामीची जोडी वेगात लक्ष्याचा पाठलाग करत होती. दोघेही हिंदुस्थानी गोलंदाजांना एकही संधी देत नव्हती. बुमरा आणि सिराज अचूक मारा करत ही जोडी पह्डण्याचा जिवापाड प्रयत्न करत होते. तेव्हाच 97 धावांवर खेळत असलेल्या डकेटने एक झेल उडवला होता, पण जैसवाल पुन्हा तो झेल टिपण्यात अपयशी ठरला आणि हिंदुस्थानने हाती आलेली खूप मोठी संधी गमावली. तेव्हा फलकावर 165 धावा लागल्या होत्या. मात्र यानंतर डकेटने जीवदानाचा लाभ उठवत वेगाने धावा काढत अडीचशेचा टप्पा गाठून दिला. डकेटच्या फटकेबाजीमुळे दुसऱया सत्रात इंग्लडने 28.3 षटकांत 152 धावा चोपून काढल्या. जैसवालने डकेटचा झेल टिपला असता तर इंग्लंड नक्कीच दबावाखाली आला असता.