
जालन्यात शिक्षण संस्थाचालकास 70 लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून 21 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादी संस्थाचालक रवि प्रदीप खोमने (रा. गांधीचमन, जालना) यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या.
24 जून रोजी गुन्हयातील आरोपी करण निकाळजे, नीलेश निकाळजे (दोघे रा. तांदूळवाडी, ता.जि. जालना), मयूर निकम (रा. कन्हैयानगर, जालना) यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील 7 लाख 91 हजार 500 रोख, गुन्हा करताना वापरलेली 10 लाखांची कार, 1200 रुपयांचे लायटर, खंडणीच्या पैशामधून खरेदी केलेले 1 लाख 7 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, 2 लाख 5 हजार रुपयांचा कॅमेरा असा एकूण 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार रामप्रसाद पव्हरे, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, देविदास भोजने, धीरज भोसले, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, चालक सौरभ मुळे आदींनी केली.