
मुंबईत आज सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला असताना समुद्राला मोठे उधाण आले. त्यामुळे साडेचार मीटरपेक्षा जास्त सर्वाधिक उंचीच्या महाकाय लाटा मुंबईच्या किनाऱ्यावर धडकल्या. या अजस्र लाटांचा तडाखा ‘कोस्टल रोड’ला बसला. जोरदार लाटांमुळे कोस्टल रोडच्या सायडिंगच्या पट्टय़ाच उखडल्या गेल्या इतका भयंकर मारा लाटांचा होता.
मुंबईत सोमवारपासून पाच सलग पाच दिवस जोरदार पाऊस आणि समुद्राला उधाण येणार असल्यामुळे पालिका-पोलिसांनी मुंबईकर-पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार समुद्र दिवसभर खवळलेल्या स्थितीतच होता. यामध्ये गुरुवारी सर्वाधिक उंचीच्या म्हणणजे 4.75 उंचीपेक्षा जास्त उंचीच्या लाटा धडकल्या.
दोन दिवस काळजीचे!
पोलीस-पालिकेने आवाहन करूनही अनेक मुंबईकर-पर्यटकांनी किनाऱयावर जात पावसाचा आनंद लुटला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, पुढील दोन दिवस समुद्राला उधाण राहणार असल्याने मुंबईकर-पर्यटकांनी काळजी घ्यावी, नसते धाडस करू नये असे आवाहन पालिकेचा आपत्कालीन विभाग आणि पोलिसांनी केले आहे.
- समुद्राच्या लाटांपासून बचावासाठी कोस्टल रोडच्या किनारी बाजूने महाकाय टेट्रापॉडचा थर लावण्यात आला आहे. शिवाय मजबूत किनारी भिंतही बांधण्यात आली आहे.
- मात्र आज खवळलेल्या समुद्राने सर्व अडथळे पार करीत कोस्टल रोडपर्यंत मजल मारत कोस्टल रोडच्या सायडिंगच्या पट्टय़ा उखडल्या.