‘बिग ब्युटिफुल’ बिल लाखो लोकांच्या नोकऱ्या खाईल! एलॉन मस्क यांचा ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्लाबोल

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने सिनेटमध्ये आणलेल्या बिग ब्युटिफुल बिलाच्या मसुद्यावर जगप्रसिद्ध उद्योजक व टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी टीका केली आहे. ‘घाईघाईने आणले गेलेले हे बिल भविष्यात लाखो नोकऱ्या खाईल आणि देशाचे मोठे नुकसान होईल, अशी भीती मस्क यांनी ‘एक्स’वर व्यक्त केली आहे.

‘हे विधेयक मूर्खपणाचे आणि विध्वंसक आहे. हे विधेयक भविष्यात येऊ घातलेल्या उद्योगांवर गंभीर परिणाम करणारे ठरेल,’ असे मस्क यांनी म्हटले आहे. ‘बिग ब्युटिफुल बिल’ मंजूर करून घेण्यासाठी ट्रम्प हे काँग्रेसवर दबाव टाकत आहेत. ‘बिग ब्युटिफुल’ विधेयकात उद्योगांशी संबंधित जाचक तरतुदी आहेत. भविष्यात येऊ घातलेल्या पवन आणि सौर प्रकल्पांवर वाढीव कर लावण्याची तरतूद यात आहे. नव्या उद्योगात अजिबात चिनी सामुग्री वापरली जात नाही हे कंपन्यांना सिद्ध करावे लागेल, अन्यथा त्यांच्यावर वाढीव कर लावला जाईल. याशिवाय, इतरही अनेक अव्यवहार्य तरतुदी या विधेयकात आहेत. यातून ऊर्जेवरील खर्च वाढण्याची भीती उद्योग जगतात व्यक्त होत आहे.