
>> शीतल धनवडे, कोल्हापूर
दहावीचा निकाल लागून दीड महिना झाला, तरी अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा भुलभुलैया पाहता, येत्या 15 जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. याउलट खासगी व बेकायदेशीर असलेल्या ऍकॅडमींमध्ये अकरावीचे वर्ग कधीच सुरू झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयात अकरावीत प्रवेश मिळाला तरी तो नावापुरताच राहणार असून, यंदाही महाविद्यालयातील वर्ग रिकामे, तर ऍकॅडमी मात्र ‘फुल्ल’ राहण्याचीच परिस्थिती आहे. शिक्षणमंत्री, तसेच शिक्षणाधिकाऱयांच्या गलथान कारभारामुळे शिक्षण खात्याचाच बट्टय़ाबोळ उडाल्याचे चित्र आहे.
यंदा दहावीचा निकाल लवकर लागल्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होऊन वर्गही लवकर सुरू होतील, अशी आशा होती. या वर्षी प्रथमच राज्यस्तरावरून एकच अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. पण यामध्ये वारंवार होत असलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांसह पालक हैराण झाल्याचे दिसून येत आहे.
सध्या जिकडे-तिकडे एक लाख ते तीन लाख रुपयांची भरमसाट फी घेऊन बेकायदेशीर खासगी ऍकॅडमींचे पेव फुटले आहे. गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना हे परवडणारे नसल्याने त्यांच्यासाठी आजही महाविद्यालयातील प्रवेश सुखकर आहे. खासगी ऍकॅडमींतील प्रवेशामुळे महाविद्यालयातील विद्यार्थिसंख्येवर परिणाम होत असल्याने वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहता, इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षण घेण्यावर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. पैशांअभावी खासगी ऍकॅडमींत प्रवेश घेता येत नसलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे मोठी कुचंबणा होत आहे. शिक्षण विभागाला ही परिस्थिती माहीत असतानाही त्यांच्याकडून याबाबत काही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे महाविद्यालयांसह खासगी ऍकॅडमी ही एक समांतर यंत्रणाच तयार झाली आहे.
खासगी व बेकायदेशीर ऍकॅडमीची पद्धत मोडीत काढण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने महाविद्यालयात बायोमेट्रिक हजेरी घेण्याची चर्चा झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा वाटत होता. मात्र, केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील शिक्षण विभागाच्या गोंधळाचा फायदा ऍकॅडमी, तसेच खासगी कनिष्ठ महाविद्यालयांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले.
एकीकडे अजूनही अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा घोळ सुरू असून, येत्या 15 जुलैपर्यंत अकरावीचे वर्ग सुरू होणार नाहीत, असे ठाम मत जबाबदार महाविद्यालयातील प्राचार्यांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळेही बहुतांशी विद्यार्थ्यांसह अनेक पालकांनी खासगी कनिष्ठ महाविद्यालयासह ऍकॅडमीतच प्रवेश घेणे पसंत केल्याचे चित्र आहे.सध्या ऍकॅडमीत प्रवेश ‘फुल्ल’ झाले असून, त्यांचे अकरावीचे वर्गही सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया नावापुरतीच राहणार असल्याचेही चित्र आहे.
Confusion in 11th Centralized Online Admission Process; Education Dept Criticized
The 11th centralized online admission process has turned chaotic, causing confusion among students and parents. The education department faces severe criticism.