
पुणे जिह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगने आज पहाटे थेट पंढरपूरच्या पवित्र वारीत हैदोस घालत वारकऱ्यांना लक्ष्य केले. वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावून त्यांना लुटले. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यभरात त्यावरून संताप व्यक्त होत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी हा विषय विधानपरिषदेत मांडत सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा घ्यावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
”पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगने पंढरपूरच्या पवित्र वारीत हैदोस घालत वारकऱ्यांना लक्ष्य केले. वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावून त्यांना लुटले. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. इतकी वाईट परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची झालेली आहे. वारीची महाराष्ट्राला परंपरा आहे. वारीसाठी महाराष्ट्र ओळखला जातो. वारकरी इश्वराच्या भक्तीसाठी या वारीत समाविष्ट होतात. अशा या वारीला गालबोट लावण्याचं काम या महाराष्ट्रात घडलं आहे. कोयता गँगचा हैदोस असा सुरू आहे की ते आता वारकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. श्रीमंतांना लुटतायत, बिल्डरांना लुटतायत, गँगवार होतेय, राजकीय बळी घेतले जातायत. पण वारकऱ्यांवर हल्ला होतोय व त्याबाबतीत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याची, घाला घालण्याची घटना काल घडली आहे. सरकारचा दरारा नाही. कोण कोणाला घाबरत नाही. गुंड मोकाट सुटले आहेत. त्यामुळे सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा घ्यावी”, अशी मागणी अनिल परब यांनी सांगितले.



























































