पुनर्विकासाला खोडा घालणाऱ्याला चपराक; घर रिकामी न केल्यास सामान घराबाहेर काढा, हायकोर्टाचे आदेश

पुनर्विकासासाठी एका आठवड्यात घर रिकामी न केल्यास त्याचे सामान घराबाहेर काढा, असे आदेश उच्च न्यायालयाने कोर्ट रिसिव्हरला दिले. बदलापूर पूर्व येथील जय साई पुष्पा को.-हौ. सोसायटीने ही याचिका केली आहे. 16 रहिवाशांची ही सोसायटी आहे. ही इमारत मोडकळीस आली आहे. इमारतीचा पुनर्विकास करायचा आहे. चंद्रकांत चंदनशिवे रहिवासी वगळता अन्य सर्वांनी घरे रिकामी केली आहेत. या सदस्याचे घर रिकामी करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. या सदस्याचे घर रिकामी करण्यासाठी पोलिसांनी सांगण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे वकील दिनेश अडसुळे यांनी न्यायालयाला दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने वरील आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही याची माहिती 8 जुलै 2025 रोजी न्यायालयात सादर करा, असे खंडपीठाने आदेशात नमूद केले.

नोटीस धाडूनही गैरहजर

चंदनशिवे यांना नोटीस धाडूनही ते न्यायालयात हजर राहिले नाहीत. त्यांच्या घराला कुलूप असल्याने दरवाजावर नोटीस लावण्यात आली. तरीही ते न्यायालयात आले नाहीत. चंदनशिवे जाणीवपूर्वक पुनर्विकासात अडथळा करत आहेत. याचा फटका अन्य रहिवाशांना बसत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.