
अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करत, वारंवार तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने सोमवारी (दि. 30) पहाटे दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी कर्जत शहरातील अल्पवयीन मुलाविरुद्ध अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मुलगी ही जामखेड तालुक्यातील एका गावात राहत असून, ती कर्जत येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. डिसेंबर 2024 मध्ये तिची ओळख संशयित आरोपीशी व्हॉट्सऍपवर झाली. पुढे जानेवारी 2025 मध्ये त्यांची पहिली प्रत्यक्ष भेट कर्जत येथील एका कॅफेमध्ये झाली. तेव्हापासून दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. मुलाने वेळोवेळी माझं तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगत तिला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने नकार दिला. त्यानंतर पीडिता नीट परीक्षेच्या तयारीसाठी अहिल्यानगर येथे आली. त्यादरम्यान मुलाने तिला भेटून तिच्यासोबत फोटो काढले.
पुढे काही दिवसांनी जेव्हा तिने त्याच्याशी बोलणे थांबवले, तेव्हा मुलाने तिला आपले फोटो तुझ्या वडिलांना दाखवीन, अशी धमकी दिली. त्यानंतर 6 एप्रिल 2025 रोजी तिला दुचाकीवरून अहिल्यानगर तालुक्यातील एका हॉटेलमध्ये नेत तरुणाने अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेली पीडिता तिच्या मामाकडे भूम (जि. धाराशिव) तालुक्यातील एका गावात राहायला गेली. मात्र, 16 मे 2025 रोजी संशयित मुलगा तिथे पोहोचून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.
त्यानंतर मुलाने तिच्या चुलतभावांना फोन करून तुझ्या बहिणीचे व माझे अफेअर आहे, मी तिचे फोटो व्हायरल करेन अशी धमकी दिली. यानंतर पीडित मुलीने तिच्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. सोमवारी पहाटे नातेवाईकांसह तोफखाना पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली. फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गोंटला करीत आहेत.