
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी पात्रात गेलेली पंचगंगा नदी दुसऱयांदा पात्राबाहेर पडली. गेल्या चोवीस तासांत पंचगंगा नदी पातळीत तब्बल तीन फुटांची वाढ झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 30 फूट 7 इंच झाली होती, तर 34 बंधारे पाण्याखाली गेले होते.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने गेल्या आठवडय़ात दि. 24 जून रोजी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले होते. धरण पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टी तसेच धरणांतील विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होऊ लागली होती. पंचगंगा नदीची वाटचाल 39 फूट धोका पातळीकडे सुरू होती, पण पावसाचा जोर ओसरल्याने, काहीसा दिलासा मिळाला होता.
दोन दिवसांपूर्वीच पंचगंगा नदीचे पाणी संथगतीने पात्रात परत गेले होते, तर महानगरपालिकेच्या वतीने पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता करण्यात आली होती. पण, पुन्हा पावसाचा जोर वाढला. काहीशी विश्रांती घेत मुसळधार कोसळणाऱया पावसामुळे पुन्हा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली. आज सकाळी पंचगंगेचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडले.