
परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने आलिशान बंगल्यावर केलेल्या कारवाईत आज 4 लाख 62 हजार रुपयांची दारू जप्त करत दोघांना अटक केली. दुसऱया कारवाईत मावा व दोन कोयते जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. दरम्यान, खाडे यांनी यापूर्वी एका मावा अड्डय़ावर टाकलेल्या धाडीवेळी फरार झालेल्या एका आरोपीलाही पकडण्यात आले.
शहरातील एडके कॉलनी परिसरात असलेल्या एका आलिशान बंगल्यामध्ये विदेशी दारूचा साठा असल्याची माहिती खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी बंगल्यावर धाड टाकून चार लाख 62 हजार 420 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी काल्या उर्फ तौफिक निजाम शेख, अल्ताफ रशीद शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तर, शहरातच असलेल्या तौफिक शेख याच्या पान दुकानावर खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकला असता या दुकानात दोन कोयते आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी पान दुकानचालक रंगनाथ दिलीप गायकवाड व रशीद हरून शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दारू प्रकरणात आरोपी असलेल्या तौफिक शेख याच्या घरात छापा टाकत या पथकाने मावा बनवणारे तीस हजार रुपये किमतीचे मशीन जप्त केले.
या कारवाईत खाडे यांच्यासह अहिल्यानगर शहर विभागाचे सहायक निरीक्षक राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, दिनेश मोरे, अरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनील पवार, अजय साठे, मल्लिकार्जुन बनकर, अमोल कांबळे, सुनील दिघे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी सहभाग घेतला.
























































