लग्नाच्या आणाभाका घेऊन दुसरीशी विवाह, प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोरच प्राण सोडले

चार वर्षांच्या प्रेमात प्रियकराने लग्नाच्या आणाभाका घेतल्या, पण प्रत्यक्षात गावी जाऊन त्याने दुसऱ्याच मुलीशी विवाह केला. हा धक्का सहन न झाल्याने दिव्यातील 22 वर्षीय तरुणीने प्रियकराच्या घरासमोरच उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रियकरावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी येथील मूळ रहिवासी असलेली तरुणी गेल्या काही वर्षांपासून दिवा परिसरात बहिणीकडे राहत होती. तिचे चार वर्षांपासून महेशबरोबर प्रेमसंबंध होते. मात्र प्रियकराने अचानक गावी जाऊन दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने ती तरुणी मानसिक तणावाखाली होती. त्यानंतर तरुणीने बहिणीला फोन करून प्रियकराच्या घराबाहेरच विष प्यायल्याचे सांगितले. खासगी रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.