वाजत गाजत या, जल्लोष करत या, आनंदाने या, हक्काने या! उद्या वरळीत होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी आदित्य ठाकरेंचे आवाहन

हिंदी सक्तीविरोधातील मराठी माणसाचा एल्गार यशस्वी झाला. त्याचा विजयोत्सव उद्या म्हणजेच 5 जुलैला (शनिवारी) वरळीच्या एनएससीआय डोममध्ये साजरा होणार आहे. हा केवळ विजयोत्सव नसेल तर मराठी माणसाच्या एकजुटीचे विराट दर्शन असणार आहे. मराठी माणसाचा आवाज त्यात शतपटीने घुमणार आहे. याच विजय मिळाव्यात वाजत गाजत या, जल्लोष करत या, आनंदाने या, हक्काने या, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी हे आवाहन केले आहे.

आपल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “जय महाराष्ट्र! पहिलीतल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या त्रिभाषा सक्ती, हिंदी सक्तीच्या विरोधात आपण सर्वांनी आवाज उठवला. आपली शक्ती जिंकली, त्यांची सक्ती तोंडावर पडली. आपला हा मराठी माणसांचा विजय साजरा करण्यासाठी उद्या आपण वरळी येथे NSCI डोमला सकाळी 10 ला भेटणारच आहोत. वाजत गाजत या! जल्लोष करत या! आनंदाने या! हक्काने या! हा लढा आपला सर्वांचा आहे,हा विजयही आपला सर्वांचा आहे!”