
>> डॉ. अरविंद नेरकर
वारकरी संप्रदायाचे दैवत हे विठ्ठल आहे. ‘रामकृष्ण हरी’ हा वारकऱ्यांचा जपमंत्र आहे. ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ हे जयघोषवाक्य आहे. टाळ, मृदंग, वीणा, चिपळ्या ही वारकऱ्यांची वाद्ये आहेत. या सर्वांसह कानाकोपऱ्यातून येणारे वारकरी आषाढी एकादशीला पंढरपुरी दाखल होतात. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे वारकऱ्यांचे ब्रीदवाक्य आजच्या काळात तंतोतंत अनुरूप आहे. वारकरी संप्रदाय हा मनामनाची मशागत करणारा आहे. प्रपंचात राहून परमार्थाचा विचार करणे हा हरिभक्तीचा मार्ग वारकरी संप्रदायाने दिला आहे. नित्य नामस्मरण, नियमित वारी यातून आध्यात्मिक आचरणात शिस्त आणि सातत्य निर्माण होते. विश्वात्मक प्रेमाचा हा मार्ग कल्याणकारी असतो.
‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ असे शब्द कानावर आले म्हणजे दिंडय़ा, पताका आणि पालखीबरोबर पंढरपूरकडे मार्गक्रमण करणारे वारकरी नजरेसमोर येतात. टाळ, मृदंगाचा गजर करत, ओव्या, अभंगांचा उच्चार करत हे वारकरी आळंदीहून निघून आषाढी व कार्तिकी शुद्ध एकादशीस पंढरपूरमध्ये पोहोचतात. वारकऱ्यांची संख्या लाखांमध्ये असते. वारीच्या या भावसोहळ्याबद्दल वर्णन करायचे म्हटले तर भक्तीचा महापूर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आजच्या विज्ञान युगात पंढरपूर वारीचे महत्त्व कमी होण्याऐवजी ते वाढतच आहे. असंख्य वारकऱ्यांसोबत अनेक जिज्ञासू या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. हा सोहळा लाखो भक्तांचा जनसमुदाय म्हणून केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातील अभ्यासकांचेदेखील आकर्षण ठरत आहे.
मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यास करताना असे लक्षात येते की, संतसाहित्य हा या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. इतकेच नव्हे तर एकूण मराठी वाङ्मयाच्या प्रवाहात मध्ययुगीन वाङ्मयाचा इ.स. 1050 ते 1820 हा कालखंड मानला जातो. संतसाहित्य हीच या कालखंडाची मुख्य धारा आहे. या साहित्याचा अभ्यास वारीचा अभ्यास केल्याशिवाय पूर्ण होत नाही. भक्तीचा मळा फुलवणारा, वेदपरंपरा जतन करणारा, संस्कृतीचे जतन करून भेदाभेद विसरायला लावणारा वारकरी संप्रदाय संत ज्ञानेश्वरांनी चैतन्यमय बनवला. त्यानंतर संतपरंपराच निर्माण झाली आणि या परंपरेने जनमानसावर कायम प्रभाव ठेवला. आजही ही परंपरा जोपासणारी सांप्रदायिक मंडळी मोठय़ा भक्तीभावाने संतवचनांचे स्मरण आणि आचरण करत असतात.
ज्ञानेश्वरांच्या अवतारानंतर 700 वर्षांनी आजही वारकरी संप्रदाय प्रभावशाली असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर आजच्या महाराष्ट्र जीवनाचा तो एक महत्त्वाचे अंग बनला आहे. वारी-वारकरी यांच्याबद्दल, त्यांच्या संप्रदायाबद्दल वैकुंठवासी मामा दांडेकर, नानामहाराज साखरे, धुंडामहाराज देगलूरकर यांसारख्या सांप्रदायिकांनी आपापली मते सश्रद्ध वृत्तीने मांडली आहेत. तसेच भा.पं. बहिरट, प्र.ज्ञ.भालेराव, रा.चिं. ढेरे, पं. रा. मोकाशी, प.ज्ञा. भालेराव, र. रा. गोसावी, ए.व्ही. इनामदार यांसारख्या अनेक अभ्यासकांनी विविध गोष्टींचा परामर्श घेऊन आपली अभ्यासपूर्ण मते मांडलेली आहेत. त्याचबरोबर डॉ. गुंथर सोंथायमर यांच्यासारख्या महाराष्ट्र संस्कृतीच्या विदेशी अभ्यासकानेही आपले मत मांडले आहे. या पार्श्वभूमीवर वारी-वारकरी संप्रदायाचा इतिहास, स्वरूप, तत्त्वज्ञान याबाबत संशोधनात्मक विचार करणे आवश्यक ठरते.
वारकरी संप्रदायाचे दैवत विठ्ठल याबद्दल जाणून घेऊ. कोणत्याही लोकप्रिय दैवताबद्दल नाना कथा प्रचलित असतात. त्या नाना प्रकारच्या व विविध कारणांनी उत्पन्न झालेल्या असतात व कर्णोपकर्णी प्रसृत होतात. काही कथा ऐतिहासिक तर काही अंशानेच ऐतिहासिक असतात. काही रूपकात्मक, उपासना संकेताच्या, विवरणात्मक तसेच विडंबन कथाही असतात. देवतेच्या माहात्म्य वर्णनासाठी काही कथा असतात, तर काही कवीच्या प्रतिभेतून उगम पावलेल्या असतात. देवतेचा इतिहास व स्वरूप समजण्यास या सर्वांचा अभ्यास उपयुक्त ठरतो. पुंडलिक व विठ्ठल यांचे साहचर्य अतूटपणाने चालत आलेले आहे. स्कंद व पद्मपुराणात पुंडलिकाची कथा आहे. माता-पित्यांची सेवा करणाऱ्या पुडंलिकाकडे श्रीकृष्णच बालरूप घेऊन आले व त्याने दिलेल्या विटेवर कर कटीवर ठेवून उभे राहिले, अशी कथा प्रसिद्ध आहे. पुंडलिक कथेचा हा भाग मागाहून वाढवलेला असावा असे काही विद्वानांचे मत आहे. हा वाढवलेला भाग एक हजारांपेक्षा जास्त मागे नेता येणार नाही, असे म. म. काणे यांचे मत आहे. आद्य शंकराचार्य यांच्या शृंगेरी पीठाने अधिकृत मानलेल्या पांडुरंगाष्टकात पुंडलिकाला वर देण्यासाठी भेटीस आलेल्या विठ्ठलाचा उल्लेख आहे. आचार्यांचा काळ इ.स.सनाचे आठवे शतक आहे. त्यापूर्वीपासून ही कथा परंपरेने चालत आलेली आहे. नृसिंहप्रसाद ग्रंथाच्या आधारे ‘तीर्थसार’ नामक भागात क्रूम व स्कंद पुराणाच्या भागात पुंडलिकक्षेत्र माहात्म्याचे पूर्ण श्लोक उद्धृत केले असून पुंडलिकाची कथा व पुंडलिकाच्या क्षेत्राची व परिसराची माहिती दिलेली आहे. पुढे श्री. बडवे आणि श्रीधरस्वामी यांनी ओवीबद्ध पांडुरंग माहात्म्याचे ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वर आदी संतांनी आपल्या लेखनात पुंडलिकाची कथा समाविष्ट करून पुंडलिकाचे माहात्म्यच अधोरेखित करून आपल्या अभंगात वर्णन केलेले आहे.
पुंडलिकाबद्दल निश्चित ऐतिहासिक काळ उपलब्ध न झाल्यामुळे पुंडलिकाविषयी निरनिराळ्या कल्पना मानल्या जातात. पंढरपूरचे भाऊसाहेब बडवे यांच्या म्हणण्यानुसार पुंडलिक (पुंडरिक) याचा संबंध पौंड्र म्हणजे कपाळावरील गंधाच्या पट्टय़ाशी आहे. यावरून असा गंधाचा पट्टा धारण करणाऱ्या वैष्णवांच्या गटालाच पुंडलिक असे म्हटले असावे. त्यांच्याच दैवतास पांडुरंग आणि क्षेत्रास पौंडरिकपूर असे नाव झाले असावे असा तर्क केला जातो. पांडुरंग देवतेबद्दल डॉ. भांडारकर यांनी कर्पूरगौरव शिवाचे नाव असल्यामुळे येथील मूळ देवता शिव आणि त्यावरून पुढे विठ्ठल हे नाव रूढ झाले असे म्हटले आहे. भत पुंडलिक व विठ्ठल हे समकालीन न मानता विठ्ठलाचे मूळ पुंडलिकाच्याही आधी शोधले पाहिजे असे रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या संशोधकांचे म्हणणे आहे. त्यासाठी धनगरांचा जावई विठ्ठल असून पदूबाई नामक कन्येचा पिता आहे यांसारख्या लोककथांमध्ये विठ्ठल दैवताचे मूळ धुंडायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजे धनगराच्या देवाचेच पुढे उदात्तीकरण झाले आणि प्रस्तुत विठ्ठलाची भव्य प्रतिमा संत वाङ्मयाद्वारे जनमानसात स्थिर झाली असावी असा त्यांचा कयास आहे.
विठोबा कानडा समजला जातो, ही समजूत गोपजनक परंपरेत अद्यापी जागृत आहे. गोपालकृष्ण हा द्वारकेहून आपले गुराखी व नऊ लाख गुरे घेऊन आला ही समजूत एकेकाळी कानडा असणाऱ्या पंढरपूरच्या आसमंतातील ज्ञानपद, धार्मिक श्रद्धा व गोपजनक संस्कृतीचे वातावरण यांच्याशी उत्कृष्टपणाने जुळते. धनगरांच्या मौखिक परंपरेतदेखील विठोबा मुख्यत्वेकरून विठोबा किंवा विराप्पा यांच्याशी संबंधित आहे. हे दोघे भाऊ असून त्यांना विठ्ठल, विराण्या असे म्हणतात. विठ्ठल हा वैष्णव वारकरी परंपरेच्या अधीन असला तरी त्याचे नाते ज्ञानपद धर्माशी जुळेल, अशी अनेक वैशिष्टय़े त्यात आहेत. कृष्ण हा एक शुद्ध वैष्णव. एक विशिष्ट पंथाचा देव होण्यापूर्वी त्याचा प्राचीन इतिहास असाच होता. विरोबा किंवा विराणा महाराष्ट्र, कर्नाटक किंवा आंध्र या प्रदेशातील धनगर जातीत सर्वदूर असलेला असा शैव देव असून त्याचे पुराण फार समृद्ध आहे. विठोबा हा गोधनमूलक गवळ्यांचा प्रतिनिधी असला तरी विरोबा किंवा विराणा हा शेळ्या आणि मेंढय़ा यांना धन मानणाऱ्यांचा (धनगरांचा) प्रतिनिधी आहे.
विठ्ठलभक्तीची प्रसिद्धी सहाव्या शतकात होती. त्याच्या दोनशे-तीनशे वर्षे अगोदर देवस्थानचे अस्तित्व असावे. त्यामुळे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून ज्ञानदेवांच्या काळापर्यंतचा काळ एक सहस्र वर्षांचा भरतो. या काळात विठ्ठलभक्तीचा उदय होऊन त्याचा प्रभाव वृद्धिंगत होत गेला आहे. ज्ञानेश्वरांनी पंढरीच्या भक्तिपंथाचा पुरस्कार केला. भक्तिप्रेमाच्या पंथात ते पूर्ण समरस झाले. पूर्वापार चालत आलेल्या या भक्तिपंथात त्यांनी नवा आशय ओतला. तो सोपा, सुटसुटीत, सखोल व अधिक व्यापक केला. पंढरीच्या भक्तिकेंद्राला नवीन तेज प्राप्त झाले. पंढरीच्या वारीला स्नेहसंमेलनाचे स्वरूप मिळाले. या संमेलनाचा कर्मकांडविरहित आचरणातून आनंद त्यांनी स्वतः लुटला व इतरांनाही लुटविला.
माझे जीवीची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले। गोविंदाचे गुणी वेधले।।
असे ज्ञानदेवांनी पंढरीच्या वारकऱ्यांचे कौतुकाने वर्णन केले आहे. ज्ञानदेवांनी केलेल्या वर्णनातून तत्कालीन वारीला नाचत-बागडत, टाळ-वीणा यांच्याद्वारे भजनात रंगणाऱ्या विठ्ठलनामात तल्लीन होणाऱ्या प्रेमळ वारकऱ्यांचे दृश्य उभे राहते.
विठ्ठल दैवत आणि वारकरी यांचा अनुबंध सांगणारे काही अभंग येथे सांगावेसे वाटतात. ‘पुंडलिक भक्त रे तारिले विश्वजना’ हा ज्ञानदेवांचा अभंग, ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’ हा जनाबाईंचा अभंग, ‘वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा’ हा संत एकनाथांचा अभंग, ‘पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षातले’ हा संत तुकारामांचा अभंग असे कितीतरी अभंग यानुसार सांगता येतील.
श्रीक्षेत्र पंढरपूर हे हिंदू धर्मीयांचे प्रमुख स्थान आहे. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, नामदेव, चोखामेळा, जनाबाई, सखूबाई, गोरा कुंभार, कान्होपात्रा, सावतामाळी, दामाजी, भानुदास आदी अनेक संतांनी पंढरीच्या विठ्ठलाचा महिमा वाढविला. प्रत्येक वर्षी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत भारतातील लाखो भाविक यात्राकाळात तसेच इतर वेळीही पंढरीत येतात आणि चंद्रभागेत स्नान करतात. श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात. पंढरपूर ही दक्षिण काशी असून त्याला संतांचे माहेरघर असेही म्हणतात. संत मंडळी आणि भक्त मंडळींच्या भक्तीने भारावून जाऊन विठ्ठलाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याची उदाहरणे श्री विठ्ठल देवतेच्या भाविक अभ्यासात आढळतात. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संतांनी भक्तिरसप्रधान काव्ये रचलेली आहेत. त्याची प्रचीती संतांचे अभंग, गवळणी व भारुडे या रचनांमधून येते.
निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत लाभलेली संतपरंपरा आणि अखंडपणे चालत आलेली वारकरी परंपरा हेच वारकरी संप्रदायाचे वैशिष्टय़ आहे. वारी हा विचार संतांनी लोकांच्या मनावर बिंबवला. वारकरी संप्रदायाच्या उभारणीपासून वाटचालीपर्यंत संतपरंपरेतून समाजाच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या काळात वारकरी संप्रदाय केवळ मार्गदर्शक आहे असे नाही, तर एकसंध समाजाची प्रचीती हा संप्रदाय देत असतो. प्रपंचात राहून परमार्थ आचरण करण्याचा सुलभ मार्ग वारकरी संप्रदायाने दाखवून दिला आहे. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान, आचार-विचार, वाङ्मयाचे सुलभ आकलन यामुळे शतकानुशतके हा संप्रदाय टिकून आहे. मनामनांची मशागत करण्याचे काम वारकरी संप्रदायाकडून शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. भेदाभेदाने पोखरलेल्या समाजाला भेदाभेद अमंगळ हा सांगणारा विचार सद्यस्थितीत प्रभावी ठरला आहे.शुद्ध आचरण, सात्विक आहार, चांगल्या विचारातून भेदाभेद, द्वेष या भावनांपासून दूर राहण्याची शिकवण वारकरी संप्रदायाकडून दिली जाते. नित्यनामस्मरण, नियमित वारी यातून आध्यात्मिक आचरणात शिस्त आणि सातत्य निर्माण होते. विश्वात्मक प्रेमाचा हा मार्ग कल्याणकारी असतो.
(लेखक संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)
























































